वृत्तसंस्था/लंडन
इंग्लंडमधील झालेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रितांच्या क्रिकेट महोत्सव टी-10 क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद भारत ब्रिस्टन संघाने पटकाविताना अंतिम सामन्यात पाकिस्तान ब्रिस्टलियन्सचा 15 धावानी पराभव केला. बेळगावच्या अमेय भातकांडेने अष्टपैलू कामगिरी करत ‘सामनावीर’ पुरस्कार पटकाविला. हिंटनचार्टर हाऊस क्रिकेट क्लबच्या मैदानावरती झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत ब्रिस्टल संघाने 10 षटकात 3 गडी बाद 105 धावा केल्या. त्यात अमेय भातकांडेने आक्रमक फलंदाजी करत 6 षटकार व 3 चौकारांच्या सहाय्याने जलद 65 धावा जमविल्या. परीक्षित शेट्टीने 2 चौकारासह 30 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तान ब्रिस्टलियन्स संघाने 10 षटकात 7 गडी बाद 90 धावा केल्याने त्यांना हार पत्करावी लागली. शोहबने 1 षटकार 2 चौकारासह 37, इम्रान खानने 3 चौकारासह 22 धावा केल्या.
भारत ब्रिस्टलतर्फे विनीतने 24 धावात 3, अमेय भातकांडेने 18 धावात 2 गडी बाद केले. या स्पर्धेत ब्रिस्टन संघाने इंग्लंड हिंटनचार्टर हाऊस क्रिकेट क्लब, ब्रिस्टल बांगलादेश यांचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली होती. लंडनमध्ये ब्रिटीश विद्यापीठ स्पोर्टस आयोजित आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत अमेय भातकांडेने 9 सामन्यात 434 धावा व 18 बळी मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अमेयने पोर्ट्समाऊथ संघाबरोबर 52, सोलेंट विद्यापीठाबरोबर 59 धावा व 3 गडी, युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाऊथबरोबर 23 धावा व 5 बळी, किंग कॉलेजबरोबर 33 धावा व 1 बळी, युनिर्व्हसिटी ऑफ सरे इलेव्हन विरुद्ध 40 धावा व 2 बळी, युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाऊथ विरुद्ध 66 धावा व एक बळी मिळविला. या साखळी स्पर्धेत 72.33 सरासरीने फलंदाजी केली. अमेयला भातकांडे स्पोर्टस अकादमीचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









