बैठकीत यात्रेच्या तयारीसंदर्भात चर्चा
वार्ताहर /उचगाव
बेकिनकेरे गावची जागृत ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2026 मध्ये भरविण्याचा निर्णय लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीने ठरविले असून, यासंदर्भात रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून लक्ष्मी देवीच्या मूर्तीला रंगकाम तसेच रथ बनविणे, मंडप डेकोरेशन, या भागात येणाऱ्या वेगवेगळ्या दुकानदारांची मांडणी तसेच खेळणी दुकानदार यांच्या संदर्भात विचारविनिमय करून बैठकीत निर्णय घेण्यात आले. बेकिनकेरे गावांमध्ये लक्ष्मी यात्रा भरविण्याच्या संदर्भात यापूर्वी मार्च, एप्रिल दरम्यान बैठक घेण्यात येऊन रेडा पालवाही सोडण्यात आलेला आहे.
आता या यात्रेला तीन महिन्याचा अवधी शिल्लक राहिल्याने लक्ष्मीदेवी यात्रा उत्सव कमिटीने यात्रोत्सवाच्या संदर्भात पूर्वतयारी ज्या ज्या आहेत त्या करण्यासाठी रविवारी सर्व लक्ष्मीदेवी उत्सव कमिटीची बैठक घेऊन या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रथमत: लक्ष्मीदेवीच्या मंदिरातील लक्ष्मीदेवीच्या मूर्तीला रंगकाम करणे, रथ बनविण्यासाठी या रथाचे लागणारे सर्व साहित्य व रथ बनविण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर तसेच लक्ष्मीदेवी यात्रा उत्सवात येणारी सर्व दुकानदार, खेळणी दुकानदार यांचे नियोजन करणे, लक्ष्मीदेवी गदगेला बसविण्यासाठी जागेचे ठिकाण व तेथील तयारी अशा अनेक विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
या यात्रोत्सवात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी चर्चा करण्यात आली. बैठकीला नारायण भडांगे, मल्लाप्पा भातकांडे, अरुण गावडे, महादेव भडांगे, मोहन पवार, नारायण भोगण, सोमनाथ भडांगे, कृष्णा खादरवाडकर, नारायण बेळगावकर, मल्लाप्पा गावडे, गजानन मोरे, विठ्ठल नंदगडे, ईराप्पा गावडे, ज्ञानेश्वर कोळी, नागेंद्र बिर्जे, भावकू धायगोडे, प्रभाकर फडके हे कमिटी सदस्य उपस्थित होते. स्वागत गजानन मोरे यांनी केले. या लक्ष्मीयात्रा संदर्भात जयवंत सावंत यांनी सविस्तर माहिती सर्वांना सांगितली. ज्ञानेश्वर कोळी यांनी आभार मानले.









