सॅफ यू-17 फुटबॉल : भारताची 3-2 गोल्सनी मात
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारताने विविध क्रीडा प्रकारात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखली असून येथे झालेल्या सॅफ यू-17 फुटबॉल चॅम्पियनशिपमध्येही भारताच्या युवा फुटबॉल संघाने पाकवर 3-2 अशी मात केली. पाक संघातील एक सदस्य मुहम्मद अब्दुल्लाहने केलेले वादग्रस्त सिलेब्रेशन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दोन्ही संघांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी याआधीच गाठलेली असल्याने हा सामना तसा बिनमहत्त्वाचाच होता. भारताने 31 व्या मिनिटाला गोल नोंदवून पाकवर आघाडी घेतली. दलालमुऑन गांगतेने हा गोल नोंदवला. 43 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर अब्दुल्लाहने गोल नोंदवत भारताशी बरोबरी साधली. हा गोल नोंदवल्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन वादग्र्रस्त ठरले. तो सहकाऱ्यांसह एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि चहा पीत असल्याची नक्कल केली. त्यांची ही घटना सामन्यानंतरही चर्चेचा विषय बनली होती. पण हे नाटक त्यांच्याच अंगलट आले. भारताने जबरदस्त खेळ करीत आपली क्षमता दाखवून देताना त्यांची जागाही दाखवून दिली. 63 व्या मिनिटाला गुनलीबा वांगकेराकपमने गोल नोंदवत भारताला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. हामझा यासिरने सात मिनिटानंतर गोल नोंदवत पुन्हा पाकला बरोबरी साधून दिली. 73 व्या मिनिटाला रहान अहमदने गोल नोंदवत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. उर्वरित वेळेत आघाडी टिकवून ठेवत विजय साकार केला. या विजयानंतर गटात भारताने अव्वल स्थान मिळविले.
दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामन्यातही पाकच्या हॅरिस रौफ व साहिबाजादा फरहान यांनी भडकावू सेलिब्रेशन करून वाद निर्माण केल्यानंतर त्यांच्या फुटबॉलपटूंनीही वादग्रस्त सेलिब्रेशनचा प्रकार केला.









