नवी दिल्ली
29 महिन्यांनंतर देशातील 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमधील बेरोजगारीचा दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. हा दर कोविड-19 नंतरचा उच्चांक आहे. यापूर्वी मे 2021 मध्ये हा दर 11.84 टक्के नोंदवला गेला होता. ताज्या दरात झालेली ही अनपेक्षित वाढ ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढल्यामुळे झाली आहे.
ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रोजगारामध्ये एका महिन्यात 28.16 टक्क्यांनी घट झाली आहे. योजनेंतर्गत सप्टेंबरमध्ये 19.53 कोटी लोकांना रोजगार मिळाला. ऑक्टोबरमध्ये ही संख्या 14.03 कोटींवर घसरल्यामुळे ग्रामीण बेरोजगारी वाढल्याचे दिसत आहे. तथापि, शहरांमधील बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील 8.9 टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये 8.4 टक्क्यांवर आला आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये देशात 97 लाख नवीन लोक कामाच्या शोधात होते. त्यापैकी 81 लाख नवीन बेरोजगार हे ग्रामीण भागातील होते.









