अर्थ मंत्रालयाकडून निर्णयावर शिक्कामोर्तब
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱयांना सरकारने महागाई भत्त्यात (डीए) वाढ करून मोठी खूषखबर दिली आहे. अर्थ मंत्रालयाने डीएमधील वाढीवर अखेर शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय कर्मचाऱयांना आता वाढीव डीएसह पगार मिळणार आहे. यासंबंधी अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने जानेवारीपासून जून 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली आहे. या वृद्धीनंतर कर्मचाऱयांचा डीए 38 टक्क्यांवरून वाढत 42 टक्के झाला आहे.
केंद्रीय कर्मचाऱयांचा महागाई भत्ता तसेच डीआरमधील वाढीला 24 मार्च रोजी मंजुरी देण्यात आली होती. परंतु अर्थ मंत्रालयाने आता यासंबंधी अधिसूचना काढली आहे. केंद्रीय कर्मचाऱयांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सुमारे 47.58 लाख कर्मचाऱयांना आणि 69.76 लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ होणार आहे. डीएमध्ये वाढ करण्यात आल्याने सरकारवरील आर्थिक भार वर्षाकाठी 12,815 कोटी रुपयांनी वाढणार आहे.
सरकार दर 6 महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱयांच्या डीएमध्ये वाढ करते. महागाई दर पाहून केंद्र सरकार कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात वाढ करत असते. महागाई दर अधिक असल्यास डीएमध्ये तितकीच अधिक वाढ होते. केंद्र सरकारने मागील सहामाहीत डीएमध्ये 4 टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाला होता.









