मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अयोध्येत घोषणा, यंदाचा दीपोत्सव ऐतिहासिक करण्याचाही निर्धार
वृत्तसंस्था /अयोध्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीत अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन करणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री योगी गुऊवारी अयोध्येत होते. त्यांच्या या दौऱ्यात अयोध्येतील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या दिवशी 21 लाख दिवे प्रज्वलित करण्याबरोबरच मोठा उत्सवही साजरा केला जाणार असल्याचे अयोध्येतील भरतकुंड येथे जाहीर सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले. मुख्य मंदिराबरोबरच विविध घाटांना नवे ऊप देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुप्तार घाट आणि सूरज कुंड पूर्वी जीर्ण झाले होते. 6 वर्षांपूर्वी ते ओसाड पडले होते. आता मात्र त्याला पूर्णपणे नवे ऊप देण्यात आले असल्याचे कालच्या पाहणी दौऱ्यात आपल्याला दिसून आल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.येत्या दिवाळी सणापासूनच अयोध्येमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. यंदाचा दीपोत्सव ऐतिहासिक होणार असून जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लवकरच येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी अनेक विमाने उतरण्यास सक्षम असतील. येथील मुख्य रेल्वेस्थानक विकसित करण्यात येत असून पुढील चार-सहा महिन्यांनंतर अयोध्येचे रस्ते दिल्लीच्या राजपथासारखे दिसणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही मोठ्या कामासाठी सुऊवातीला काही अडचणींचा सामना करावा लागतो, असेही ते म्हणाले.
दोन दिवसांचा अयोध्या दौरा
अयोध्येत आजकाल हजारो कोटींच्या विकास योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. ते सध्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येत सुरू असलेल्या विकास योजनांची जागेवर जाऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत.









