गोकाक ग्रामीण पोलिसांची कारवाई
बेळगाव : गोकाक तालुक्यातील दुंडनट्टी गावामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात येत होता. याची माहिती गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकांना मिळाली. त्यांनी तातडीने धाड टाकून याप्रकरणी वाळू व बोट जप्त केली आहे. मागील काही दिवसांपासून दुंडनट्टी गावामध्ये बेकायदेशीररित्या वाळू उपसा करण्यात येत होता. याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. याची माहिती गोकाक पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी दुंडनट्टी येथे बोटच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी धाड टाकली. तेथील बोट व 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी विठ्ठल माळगी, मल्लिकार्जुन माळगी, लक्ष्मण गोविंदप्पागोळ यांच्यावर गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.









