नगरसेवक अजिम पटवेगार यांनी केला महसूल वसुलीबाबत आरोप : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत चर्चा
बेळगाव ; महसूलवाढीसह विकासाच्यादृष्टीने सूचना करताना महापालिकेचा महसूल किती आहे, याची कल्पना नवनिर्वाचित नगरसेवकांना नाही. मात्र महापालिकेच्या महसुलापेक्षा येथील अधिकाऱ्यांचा महसूल मोठ्या प्रमाणात जमा होत असल्याचा आरोप नगरसेवक अजिम पटवेगार यांनी केला. घरपट्टी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचा खुलासादेखील बैठकीत केला. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी आयोजित बैठकीत नगरसेवकांनी विविध समस्यांसह मनपा अधिकाऱ्यांच्या कारभाराबद्दल तक्रारीचे ताशेरे ओढले. महापालिकेचा महसूल किती आहे, याची कल्पना नगरसेवकांना नाही. मात्र नागरिकांची कामे घेऊन महापालिकेत यावे लागते. त्यावेळी मनपा अधिकाऱ्यांच्या कारभाराचे कारनामे चव्हाट्यावर येत असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेत मालमत्तेची नोंद केल्यानंतर साडेसहाशे ते सातशे रुपये घरपट्टी बसते. मात्र मालमत्तेची नोंद करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे महापालिकेच्या महसूल वसुलीपेक्षा अधिकाऱ्यांची वसुली वाढल्याचे नगरसेवक अजिम पटवेगार यांनी स्पष्ट केले. असे प्रकार थांबविण्याची गरज असून मनपाचा महसूल कसा वाढेल, यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात याव्यात, अशी सूचना केली.
प्रशासकीय कालावधीत अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण या तरतुदींची अंमलबजावणी झाली नाही. अर्थसंकल्पातील सर्व तरतुदी केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे मागीलवर्षी ज्या तरतुदींची पूर्तता झाली नाही, त्यांची माहिती घ्यावी व नव्याने त्या तरतुदी करून अंमलबजावणी करण्याचा अर्थसंकल्प तयार करण्यात यावा, अशी सूचना नगरसेवक रवी साळुंके, मुज्जमिल डोणी यांनी केली. शहराच्या विकासाच्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विविध समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले आहेत. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने स्वच्छ बेळगाव आणि स्मार्ट बेळगाव बनविण्यासाठी प्रयत्न करू, यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात याव्यात, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. अर्थसंकल्प बैठकीत विरोधक नगरसेवकांनी विविध सूचना मांडल्या. अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली. वॉर्डमधील समस्यादेखील मांडल्या. मात्र सत्ताधारी गटातील काही मोजक्या नगरसेवकांनी सूचना मांडल्या, हे नगरसेवक वगळता सर्व नगरसेवकांनी केवळ बाक वाजविण्यावर समाधान मानले.









