बार असोसिएशनने पुढाकार घेणे गरजेचे
बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पुन्हा पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या आवारात पार्किंग करताना दुचाकीस्वार कोणतेच नियम पाळण्यास तयार नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी पार्किंग करू नये, यासाठी दोरी बांधली आहे. या पार्किंगला शिस्त लागावी यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. मात्र अजूनही पार्किंगला शिस्त नसल्याचे दिसून आले आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात दुचाकीसह चारचाकी पार्किंग केल्या जातात. मात्र त्या योग्यप्रकारे केल्या जात नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे ये-जा करणेही अडचणीचे ठरत आहे. तेव्हा पार्किंगला शिस्त लावण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनने पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात विविध न्यायालयांसाठी इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे पार्किंगची जागा कमी होत चालली आहे. दुचाकीस्वार जागा नसल्यामुळे मिळेल त्याठिकाणी पार्किंग करून न्यायालयात जात आहेत. त्याचा परिणाम ये-जा करणाऱ्या वकील व पक्षकारांवर होताना दिसत आहे. आता बार असोसिएशननेच यासाठी योग्य ते पाऊल उचलून पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.









