हिरेबागेवाडीचाही समावेश : नगरविकास खात्यातर्फे हालचाली गतिमान
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नगरपंचायतींचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. तालुक्यात एकूण 59 ग्राम पंचायती होत्या. त्यानंतर मच्छे व पिरनवाडी या दोन ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा तालुक्यातील हिंडलगा, बेनकनहळळी, हिरेबागेवाडीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्य सरकार व नगरविकास खाते यासाठी प्रयत्न करत असून बेंगळूर येथेही यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. परिणामी या तिन्ही ग्राम पंचायतींना लवकरच नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात आता एकूण पाच नगरपंचायती होणार आहेत. बेळगाव तालुक्यातील 10 हून अधिक ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत हालचाली सुरू होत्या. त्यानंतर प्रारंभी मच्छे व पिरनवाडी यांना त्याचा मान मिळाला आहे. आता आणखी तीन नगरपंचायतींना दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू असून राज्य सरकार व नगरविकास खात्यानेही याला हिरवा कंदील दाखविल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा करुन शिक्कामोर्तब करण्यात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर आणखी काही ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकूण 10 हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांना नगर पंचायतीचा दर्जा दिला जातो. तसे पाहिल्यास बेळगाव शहरालगत असणाऱ्या अनेक ग्राम पंचायती या नगरपंचायती होण्यास पात्र आहेत. मात्र सध्या बेळगाव तालुक्यातील तीन ग्राम पंचायतींचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे आहे. सध्या त्याला कॅबीनेटमध्ये मंजुरी मिळाली तर त्यांचीही तातडीने नगरपंचायतीमध्ये वर्णी लागणार आहे. बेळगाव तालुक्यातील तीन व चिकोडी तालुक्यातील चार अशा जिल्ह्यात एकूण 7 नगरपंचायतींचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळाली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तीन नगरपालिकांसाठी प्रस्ताव
बेळगाव जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक तालुक्यांतील लोकसंख्याही वाढत आहे. नगरपालिकांसाठी 50 हजार लोकसंख्या असेल तर त्याला नगरपालिकांचा दर्जा देण्यात येतो. सध्या निपाणी आणि चिकोडी या नगरपालिका आहेत. मात्र आता अथणी, बैलहोंगल, सौंदत्ती यांचाही प्रस्ताव नगरपालिकांसाठी पाठविण्यात आला आहे. सध्या या तिन्ही ठिकाणी 50 हजार लोकसंख्येची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.









