पहिल्यांदा दाखल झालेली एक्स्प्रेस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
बेळगाव : बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसची मंगळवारी यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. बेळगावमध्ये पहिल्यांदाच वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाल्याने पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नैर्त्रुत्य रेल्वेने जाहीर केलेल्या योग्य वेळेत एक्स्प्रेस दाखल झाल्याने लवकरच बेळगाव-बेंगळूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावेल, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे. बेंगळूर-धारवाड दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. यासाठी मंगळवारी वंदे भारतची चाचणी घेण्यात आली. विमानाप्रमाणे अत्याधुनिक सेवासुविधा असणारी वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी बेळगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली. रेल्वेतील व्यवस्था पाहण्यासाठी प्रवाशांनी आतमध्ये प्रवेश केला. विस्टाडोमप्रमाणे डब्याची रचना तसेच आलिशान आसन व्यवस्था आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. बेळगाव रेल्वे स्थानकात सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2 वाजता एक्स्प्रेस पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. वंदे भारतची चाचणी यशस्वी झाल्याने प्रवाशांनी ‘भारत माता की जय’ तसेच मिठाईचे वाटप करून आनंद साजरा केला. यावेळी नैर्त्रुत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच बेळगावमधील नागरिक उपस्थित होते. नैर्त्रुत्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, श्रीधर हुलिकावी यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगाव-बेंगळूर प्रवास 7 तास 45 मिनिटांचा
बेंगळूर-बेळगाव वंदे भारतच्या चाचणीसाठी चेन्नई येथून आठ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस पहाटे बेंगळूर येथे तैनात करण्यात आली होती. पहाटे 5.45 वाजता बेंगळूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुपारी 1.30 वाजता बेळगावला पोहोचली. तर दुपारी 2 वाजता बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी बेंगळूरला पोहोचली. एकूण 7 तास 45 मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. सध्याच्या वेगवान एक्स्प्रेसपेक्षाही कमी कालावधीत बेंगळूर-बेळगाव प्रवास करता येईल. यासाठी अपेक्षीत भाडे सामान्य कोचसाठी 1500 रुपये तर एक्झिक्युटिव्ह कोचसाठी 3000 रुपये असणार आहे.









