शरीरप्रकृती उत्तम राखण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते ही बाब सर्वज्ञात आहे. कित्येक लोक सकाळी चालावयास किंवा पळावयास जाणे, घरातच दंड बैठका असा व्यायाम करणे, योगासने आणि प्राणायाम करणे, विविध प्रकारच्या सोप्या किंवा अवघड कसरती करणे, इत्यादी मार्गांचा अवलंब करुन शरीराची निगा राखतात. हा व्यायाम करतानाही काही लोक आपल्याकडे इतरांचे लक्ष कसे वेधले जाईल, हे पहात असतात. यासाठी ते व्यायामही अफलातून पद्धतीने करतात.
सध्या सोशल मिडियावर अशाच एका व्यायामाचे व्हिडीओ चित्रण प्रसारित करण्यात येत आहे. यात एक व्यक्ती चक्क म्हशीच्या पाठीवर दंड काढताना दिसत आहे. त्या म्हशीलाही या प्रकाराची सवय असावी. कारण ती काहीही हालचाल न करता आपल्या पाठीवर चाललेला हा व्यायाम शांतपणे चालू देत असलेली दिसून येते. हा प्रकार एका गवताळ कुरणात चाललेला आहे आणि या म्हशीच्या आसपास इतरही अनेक म्हशी आहेत. त्याही कोणतीही हालचार न करता, हा प्रकार पहात आहेत, असे या व्हिडीओ चित्रणावरुन दिसून येत आहे.
असा व्यायाम ही व्यक्ती केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी करीत आहे, असेही वाटत नाही. कारण हा व्हिडीओ या व्यक्तीने प्रसारित केलेला नाही. तर अय कोणत्यातरी व्यक्तीने प्रसारित केल्याचे समजून येते. हा व्हिडीओ चार लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे आणि त्याच्याखाली विविध कॉमेंटस् ही केल्या आहेत. एकंदर, व्यायामाचा हा प्रकार स्वारस्यपूर्ण असल्याचे वाटते.









