7 ऑगस्ट रोजी होणार प्रक्षेपण ः विद्यार्थ्यांकडून निर्मित उपग्रहासह झेपावणार
वृत्तसंस्था / चेन्नई
भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्वतःच्या ‘स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल’चे (एसएसएलव्ही) पहिल्यांदाच 7 ऑगस्ट रोजी प्रक्षेपण करणार आहे. इस्रोनुसार एसएसएलव्ही-डी1 रॉकेट 7 ऑगस्टला सकाळी 9.18 वाजता श्रीहरिकोटा येथील लाँचपॅडवरून झेपावणार आहे. 500 किलोग्रॅमचे कमाल वहनक्षमता असणारे हे रॉकेट स्वतःसोबत पृथ्वी अवलोकन उपग्रह-02 (ईओएस-02) नेणार आहे. या उपग्रहाला पूर्वी मायक्रोसॅटेलाइट-2ए या नावाने ओळखले जात होते. याचे वजन सुमारे 142 किलोग्रॅम आहे.
एसएसएलव्ही उपग्रह 6 मीटर रिजोल्युशनयुक्त एक इन्फ्रारेड कॅमेरा नेणार आहे. त्यावर एक स्पेसकिड्स इंडियाकडून संचालित सरकारी शाळांच्या 750 विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला 8 किलोग्रॅमचा आझादीसॅट उपग्रह असणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत याची निर्मिती करण्यात आल्याने या प्रकल्पाचे विशेष महत्त्व असल्याचे स्पेसकिड्स इंडियाने म्हटले आहे.
8 किलोग्रॅम वजनाच्या आझादीसॅट उपग्रहात 75 फेमटो एक्सपेरिमेंट आणि सेल्फी कॅमेरे देखील असतील. हा उपग्रह सोलर पॅनेल आणि दीर्घ अंतराच्या दूरसंचार ट्रान्सपॉडरची छायाचित्रे घेण्यासाठी उपयुक्त असणार आहे. इस्रोच्या 6 महिन्याच्या कालावधीच्या मोहिमेचा हा प्रकल्प आझादी का अमृत महोत्सव समारंभाचा हिस्सा आहे.









