नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रविवारी अरुणाचल प्रदेशच्या दौऱयाला प्रारंभ करणार असून ते भारत-चीन सीमारेषेवरील भारतीय भूमीतील खेडय़ाला भेट देतील, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. दे भेट देणार असलेल्या खेडय़ाचे नाव किबिथू असे आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रगत सीमावर्ती खेडी’ या प्रकल्पाअंतर्गत ते या खेडय़ाला भेट देणार आहेत.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 4 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी 2 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केवळ सीमावर्ती खेडय़ांमध्ये मार्ग निर्मिती करण्यासाठी आहे. आर्थिक वर्ष 2022 ते 2025 या तीन वर्षांमध्ये ही मार्गनिर्मिती केली जाणार असून त्यामुळे भारतीय सैन्य आणि सर्वसामान्य नागरीक यांच्या सीमावर्ती भागांमधींल हालचालींना अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. आजपर्यंत ज्या सीमावर्ती भागांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, तेथे आता लक्ष देण्यात येत आहे.
केवळ अरुणाचल प्रदेशच नव्हे, तर सिक्कीम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही सीमावर्ती खेडय़ांमध्ये हा प्रकल्प लागू करण्यात येईल. यासाठी भारताच्या उत्तर सीमेवरील 2,967 खेडय़ांची निवड करण्यात आली आहे. ही खेडी सामरिकदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखली जात आहेत.









