केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा राहणार उपस्थित : अन्य विकासकामांनाही चालना देणार
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा सोमवार दि. 15 रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. यावेळी अनगोळ चौथे रेल्वेगेट येथील रोड अंडरब्रिजचे भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे रोड अंडरब्रिजच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. त्याचबरोबर अन्य विकासकामांनाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते चालना मिळेल. शहराच्या दक्षिण भागात असणाऱ्या अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले आहे. जलवाहिन्या व इतर केबल्स इतरत्र जोडण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे रोड अंडरब्रिजच्या कामाला कुठेही अडथळा येणार नाही. नागरिकांना विश्वासात घेऊन ब्रिजचे काम हाती घेण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी 3 वाजता रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा अनगोळ येथे पोहोचणार आहेत. यावेळी रेल्वेगेटच्या कामाची पाहणी करण्यासोबतच ब्रिजच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. सध्या पावसाळा संपत आला असल्याने रोड अंडरब्रिजच्या कामाला वेग येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दादर एक्स्प्रेसला खानापूरमध्ये थांबा…
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते खानापूर येथील रोड अंडरब्रिजच्या कामाचे भूमिपूजन सायंकाळी 5 वाजता होणार आहे. खानापूर येथील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची उ•ाणपुलाची मागणी होती. ती अखेर पूर्ण होणार आहे. याबरोबरच हुबळी-दादर एक्स्प्रेसला खानापूर येथे थांबा देण्यात आला आहे. याचाही शुभारंभ रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे खानापूरच्या प्रवाशांना आता मुंबई गाठणे सोयीचे होणार आहे.









