बेंगळूरच्या लिलाभारती सिटी येथे सत्कार : अरिहंत हॉस्पिटलचे एमडी-सीईओ म्हणून कार्यरत
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांना ‘सोसायटी ऑफ मिनीमल इव्हेसिव्ह कार्डीओ व्हॅस्क्यूलर अॅण्ड थोरासिक सर्जन ऑफ इंडिया’ या मानाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. बेंगळूरच्या लिलाभारती सिटी येथे आयोजित सोसायटीच्या 9 व्या वार्षिक परिषदेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने केलेल्या रुग्णसेवेची दखल घेऊन डॉ. एम. डी. दीक्षित यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी आयएसएमआयसीएसचे अध्यक्ष हुसम भालकी, डॉ. सत्तकी नंबाला, डॉ. युगल मिश्रा, डॉ. रजनीश मल्होत्रा यांच्यासह देश-विदेशातील हृदयरोगतज्ञ व हृदय शल्यचिकित्सक सहभागी झाले होते. डॉ. एम. डी. दीक्षित यांनी जेएनएमसीमधून एमबीबीएस, त्यानंतर एमएस ही पदवी घेतली. तसेच डीएनबी ही पदवीही मिळविली. बायपास शस्त्रक्रियेवर त्यांनी पीएचडी केली असून आजपर्यंत त्यांनी 40 हजारहून अधिक ओपन हार्ट सर्जरी केल्या आहेत. यामध्ये 7 हजार 500 हून अधिक बालहृदय शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.
मिनीमल अॅक्सेस व्हॉल्व व रोबोटिक हार्ट सर्जरी करणारे कर्नाटकातील ते पहिले डॉक्टर होत. 900 ग्रॅम वजनाच्या नवजात शिशुवर व 7 महिन्याच्या गर्भवतीवर त्यांनी हृदयशस्त्रक्रिया केली आहे. सध्या ते अरिहंत हॉस्पिटलचे एमडी व सीईओ म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत.









