डिसेंबर 2022 मध्ये 1.49 लाख कोटी संकलन, मागील वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रविवारपासून सुरू झालेल्या 2023 या नववर्षारंभी जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने अर्थव्यवस्थेला सुखद धक्का दिला आहे. डिसेंबर 2022 चा जीएसटी करसंकलनाचा आकडा रविवारी जाहीर झाला. त्यात सलग दहाव्या महिन्यात 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी महसूल प्राप्त झाला आहे. एकंदर जीएसटी संकलनातून सरकारला भरघोस कमाई होत असल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबर 2022 मध्ये जीएसटी महसूल 15 टक्क्मयांनी वाढून 1.49 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे रविवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केले. डिसेंबर 2022 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,49,507 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये सीजीएसटी 26,711 कोटी, एसजीएसटी 33,357 कोटी रुपये जमा झाले. तसेच आयजीएसटी अंतर्गत 78,434 कोटी रुपये जमा झाले असून त्यात सामग्रीच्या आयातीवर गोळा केलेले रु. 40,263 कोटी समाविष्ट आहेत. त्याव्यतिरिक्त सेस (उपकर) 11,005 कोटी रुपये जमा झाला असून त्यात आयातीवर संकलित केलेल्या 850 कोटी रुपयांचा समावेश आहे.
सलग दहाव्या महिन्यात 1.4 लाख कोटींपेक्षा जास्त
सरकारने जीएसटी संकलनात केलेल्या काही सुधारणांमुळे आणि रितसर करसंकलनामुळे आकडेवारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या सलग दहा महिन्यांपासून जीएसटी महसूल 1.40 लाख कोटी रुपयांहून अधिक जमा झाला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये वस्तू आणि सेवा करांमधून सुमारे 1.46 लाख कोटी रुपये जमा झाले. त्यामध्ये डिसेंबरात आणखी वाढ झाली आहे.
नोव्हेंबरमधील ई-वे बिल
नोव्हेंबर 2022 मध्ये 7.9 कोटी ई-वे बिले प्राप्त झाली असून ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 7.6 कोटी ई-वे बिले प्राप्त झाली होती.
वार्षिक आधारावर उत्कृष्ट महसूलवाढ
डिसेंबर 2022 मध्ये सरकारला आलेला महसूल गेल्या वषीच्या म्हणजेच डिसेंबर 2021 च्या तुलनेत 15 टक्क्मयांनी अधिक आला आहे. डिसेंबर 2022 मध्ये, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर 8 टक्के जास्त आहे आणि सेवांच्या आयातीचाही समावेश असलेल्या देशांतर्गत व्यवहारांत 18 टक्के जास्त आहे.
सेटलमेंटनंतर प्राप्त महसूल
सरकारने नियमित सेटलमेंट अंतर्गत 36,669 कोटी रुपयांचा सीजीएसटी आणि 31,094 कोटी रुपयांचा एसजीएसटी निश्चित केला आहे. डिसेंबर 2022 मध्ये राज्ये आणि केंद्राला नियमित सेटलमेंटनंतर सीजीएसटीमधून 63,380 कोटी रुपये आणि एसजीएसटीमधून 64,451 कोटी रुपये मिळाले आहेत.









