दलाई लामा यांचा आरोप ः चीनचे प्रयत्न ठरणार अयशस्वी
वृत्तसंस्था/ बोधगया
बिहारच्या बोधगया येथील कालचक्र मैदानात तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला आहे. चीनचे सरकार बौद्ध धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. बौद्धधर्माला विषारी मानून तो संपविण्यासाठी चीन एक मोहीम राबवत असल्याचा आरोप दलाई लामा यांनी केला आहे.
बौद्ध धर्मात आमचा पूर्ण विश्वास आहे. ट्रान्स हिमालयीन क्षेत्रात गेल्यावर तेथील स्थानिक लोकांमध्ये बौद्ध धर्माबद्दल पूर्ण श्रद्धा दिसून येते. हीच स्थिती मंगोलिया आणि चीनमध्ये आहे. चीनचे सरकार बौद्ध धर्म संपवू पाहत असले तरीही तेथील लोकांची यावरील श्रद्धा कायम आहे. चीनने बौद्ध धर्माला अनेकदा नुकसान पोहोचविले आहे, परंतु या धर्माला चीनमधून कधीच संपविता येणार नाही, कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे अनेक लोक आहेत असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
चीनने अनेक बौद्ध मठांना नष्ट केले तरीही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणाऱया लोकांच्या संख्येत कुठलीच घट झालेली नाही. आजही चीनमध्ये बौद्ध धर्माचे अनेक मठ आहेत आणि लोकांचा बौद्ध धर्माशी दृढ संबंध आहे. जे लोक माझ्यावर आस्था ठेवण्यासह बौद्धधर्मात श्रद्धा ठेवत आहेत, त्यांनी माझ्याकडून प्रदान करण्यात येणारे बोधिचित्त स्वीकारावे असे ते म्हणाले.
बोधगयाच्या पवित्र भूमीवरून सर्व जीवांच्या हितासाठी भगवान बुद्ध यांच्या शरणात जाण्याचा संकल्प सर्वांनी घ्यावा असे लामा यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी सर्वांना दीक्षा दिली आहे. या सोहळय़ाच्या समारोप प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित होते.









