वृत्तसंस्था / वाराणसी
ज्ञानवापी संबंधीच्या सर्व सात प्रकरणांची सुनावणी एकत्र घेण्यात येईल, अशी घोषणा वाराणसी येथील न्यायालयाने केली आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी यासाठी 7 जुलै हा दिवस निर्धारित केला आहे. या दिवसापासून ही सुनावणी सुरु केली जाणार आहे. सर्व प्रकरणांची एकत्र सुनावणी करण्याची सूचना हिंदू पक्षकारांच्या विधिज्ञांकडून करण्यात आली होती.
या प्रकरणांमधील हिंदू पक्षकारांनी ही मागणी करणारी याचिका सादर केली होती. मात्र, एकत्र सुनावणी करण्यास मुस्लीम पक्षाने आक्षेप घेतला होता. हिंदू पक्षकारांचे विधिज्ञ सुभाष चतुर्वेदी यांनी युक्तीवाद करताना ही सातही प्रकरणे एकाच स्वरुपाची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक प्रकरणावर वेगळी सुनावणी घेण्याचे कारण नाही. सर्व सात प्रकरणे न्यायालयाने एकत्र करावीत आणि सुनावणी करावी, अशी सूचना त्यांनी केली. न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांचे आक्षेप फेटाळत ही सूचना मान्य केली आणि सर्व प्रकरणे एकत्र करण्याचा आदेश दिला.









