अध्यक्षपदी सुनील मुतगेकर तर सचिवपदी लक्ष्मण शिंदे यांची निवड
प्रतिनिधी/ बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन या संघटनेचा 2023 सालच्या पदाधिकारी आणि संचालकांचा अधिकारग्रहण सोहळा रविवार दि. 2 एप्रिल रोजी गॅलेक्सी हॉल येथे होणार आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील मुतगेकर, सचिवपदी लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्षपदी अविनाश पाटील, अऊण काळे तर खजिनदारपदी विजय बनसुर यांची निवड झाली आहे.
संचालक म्हणून अजित कोकणे, सुनील चौगुले, राहुल बेलवलकर, विश्वास पवार, गावडू पाटील, अनिल चौगुले, राजू जैन, महेश रेडेकर, दिगंबर किल्लेकर आणि आनंद कुलकर्णी यांची निवड झाली आहे.

अध्यक्ष सुनील मुतगेकर बांधकाम व्यावसायिक असून आठ वर्षांपासून जायंट्सच्या माध्यमातून सक्रिय समाजसेवा करत आहेत. त्यांनी दोन वेळा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सलग दोन वर्षे त्यांना उत्कृष्ट उपाध्यक्ष म्हणून जायंट्स इंटरनॅशनलने सन्मानित केले आहे. लालबहाद्दूर शास्त्री गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
सचिव लक्ष्मण शिंदे बीकॉम, एलएलबी पदवीधर असून कुशल ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आहेत. एक उत्तम योग शिक्षक म्हणून त्यांचा परिचय आहे. जायंट्सचे तीन वर्षे खजिनदारपद भूषविले. शास्त्रीनगर पंच कमिटीचे खजिनदार असून गणेश मंडळाचे 6 वर्षे खजिनदार पद भूषविले आहे.
अविनाश पाटील हे अॅल्युमिनियम फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. गेल्या बावीस वर्षांपासून जायंट्समध्ये कार्यरत आहेत. त्यांनी तीन वेळा सचिव म्हणून तर एकदा खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
अऊण काळे पदवीधर असून बॉश पंप दुऊस्तीचा व्यवसाय आहे. ते अनेक वर्षे जायंट्समध्ये सक्रिय असून दोन वेळा खजिनदार म्हणून काम केले आहे. ते एसपीएम रोड गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत.
खजिनदार विजय बनसुर बीकॉम, एलएलबी असून केशव सिमेंटमध्ये आर्थिक आणि कायदेशीर विभागप्रमुख म्हणून पंचवीस वर्षे काम केले आहे. त्यांनी जायंट्सचे सचिवपदही सांभाळले आहे. ते योग मार्गदर्शन केंद्र वडगावचे अध्यक्ष आहेत.
या अधिकारग्रहण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स वेल्फेअरचे फौंडेशनचे विशेष समिती सदस्य मोहन कारेकर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अशोक अलगोंडी उपस्थित राहणार आहेत.

डॉ. शिवाजी कागणीकर यांना ‘जायंट्स भूमिपुत्र’ पुरस्कार
बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये 2 लाख झाडे लावणारे तसेच जलसंवर्धन करत विहिरी व बंधाऱ्यांची निर्मिती करणाऱ्या डॉ. शिवाजी कागणीकर यांना जायंट्सतर्फे ‘जायंट्स भूमिपुत्र’ पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी नरेगा योजनेतून अनेकांना काम मिळवून दिले आहे. तसेच ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या आहेत.









