जनतेने प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे : अन्यथा घंटागाडी करावी लागणार बंद
बेळगाव : बाजार पेठेतील कचरा जमा करुन ब्लॅकस्पॉट (कचऱ्याचे ढीग) निर्मूलन करण्यासाठी आम्ही घंटागाडी सुरू केली आहे. गेल्या आठड्याभरापासून आम्ही घंटागाडी सुरू केली असून आता त्याला प्रतिसाद वाढत आहे. मात्र हा कायमस्वरुपी प्रतिसाद राहिला तरच घंटागाडी सुरू ठेवली जाणार आहे. अन्यथा ती बंद करावी लागणार आहे. सुरूवातीला काही जणांनी कचरा देण्याचे टाळले. मात्र आता बरेच व्यावसायिक कचरा देत आहेत. असाच प्रतिसाद मिळाला तर या योजनेचा लाभ होणार आहे. बाजारपेठेतील कचरा गोळा करण्यासाठी सायंकाळी 6.30 नंतर घंटागाडी रात्री 9 पर्यंत फिरविली जात आहे. शहराची मूख्य बाजारपेठ तसेच वडगाव, शहापूर, अनगोळ, शाहूनगर, सदाशिवनगर, गांधीनगर या या परिसरात घंटागाडी सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता एच. व्ही. कलादगी यांनी दिली. एकूण 22 घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याला व्यावसायिकांनीही तेवढाच प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरामध्ये फिरणाऱ्या 22 घंटागाड्यांचा कचरा दोन मोठ्या वाहनांमधून तो तातडीने कचरा डेपोमध्ये नेवून टाकण्यात येत आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांच्यावर जो ताण पडत आहे तो कमी होवू शकतो. तेव्हा व्यापाऱ्यांनी इतरत्र कोठेही कचरा न टाकता तो कचरा घंटागाडीकडेच द्यावा. जेणे करुन कोठेही कचरा पडणार नाही. त्यामुळे शहरही स्वच्छ होईल आणि दुर्गंधीही पसरणार नाही. तेव्हा सायंकाळी 9 पर्यंत सुका व ओला कचरा देण्याचे आवाहन एच. व्ही. कलादगी यांनी केले आहे. शहरातील तसेच उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट तयार होत आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. तेव्हा घंटागाडी आल्यानंतरच कचरा द्यावा. मुख्यता बाजारपेठेमधील दुकानदारांनी याबाबत काळजी घ्यावी. रात्री 9 वाजेपर्यंतचा कचरा घंटागाडीकडे दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जमा झालेला कचरा घंटागाडी येताच तातडीने द्यावा. त्यामुळे ब्लॅकस्पॉट राहणारच नाहीत, असे त्यांनी सांगितले.
सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे द्या
घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करत आहेत. मात्र सुका आणि ओला कचरा एकत्र दिला जात आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. सुका आणि ओला कचरा स्वतंत्रपणे द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.









