भारतातील बहुतेक सर्व शहरांमध्ये कचऱयाची ढीग साठलेले असतात. महिनोन् महिने ते उचलले जात नाहीत. कचराकुंडय़ा ओसंडून वाहात असतात. कचरा ही जणू आपली राष्ट्रीय संपत्ती असल्याप्रमाणे तिचे प्रदर्शन होत असते. सर्वसामान्यांनाही आता त्याचे काही वाटेनासे झाले आहे. पण जपानसारख्या अतिप्रगत देशाची राजधानी असणाऱया टोकियो शहरातही कचऱयांच्या ढिगाची समस्या आहे, हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. तथापि, टोकियोच्या महानगरपालिकेने हे ढीग हटविण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे.
जपानमध्ये व्यायामप्रिय लोकांची संख्या खूप मोठी आहे. असे लोक सर्व ऋतुंमध्ये सकाळी उठून किंवा त्यांच्या सवडीनुसार केव्हाही धावण्याचा व्यायाम घेताना दिसतात. अशा लोकांचा उपयोग कचऱयाची ढीग हटविण्यासाठी करण्याची ही युक्ती आहे. या शहराच्या महानगरपालिकेने कचरा उचलण्याची स्पर्धा आयोजित केली असून धावप्रिय लोकांनी आपल्याबरोबर कचऱयाची पिशवी जवळ बाळगायची आहे. रस्त्यात कोठेही कचऱयाचा ढीग दिसल्यास त्यातील कचरा या पिशवीत भरायचा आणि धावत जाऊन ती पिशवी विशिष्ट ठिकाणीच ठेवायची, अशी ही स्पर्धा आहे. लोकांच्या धावण्याबरोबरच आपोआप कचरा उचलला जाईल, अशी महानगरपालिकेची अपेक्षा असून ती पुष्कळ प्रमाणात पूर्ण होतानाही दिसत आहे. अनेक धावप्रिय लोकांनी या स्पर्धेसाठी नावे नोंदविली असून मोठी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. सर्वात जास्त कचरा जी व्यक्ती गोळा करेल, तिला बक्षिस दिले जाते. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला जो खर्च आला असता त्या तुलनेत बक्षिसासाठी द्यावी लागणारी रक्कम कमी असल्याने महापालिकेचा आर्थिक नफाही होत आहे. नाहीतरी आपण धावणारच आहोत, थोडा कचरा घेऊन धावल्यास काय बिघडणार आहे? असा विचार सर्वसामान्य लोक करीत आहेत. अशाप्रकारे कमी खर्चात शहर स्वच्छ करण्याचा हा अभिनव आणि अनोखा उपक्रम टोकियोची महानगरपालिका अवलंबत आहे. प्रारंभी प्रायोगिक तत्वावर काही भागांमध्ये तो करण्यात आला. यशस्वी ठरल्यानंतर आता शहरभर हा उपक्रम राबविला जात आहे. कचऱयाचे ढीग लोकांनीच केलेले असतात. त्यामुळे लोकांकडूनच ते उचलून घेण्याची ही युक्ती कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया आहे. अनेक धावप्रेमी लोक आपली एक टिम बनवून या स्पर्धेत भाग घेत आहेत.









