ज्ञानेश्वरीच्या सुरवातीला गणेश वंदना करताना माउली म्हणतात, देवा निर्गुण असलेला तूच गणेशरूप घेऊन सगुण झालेला आहेस. संपूर्ण वेदराशींनी युक्त असा देखणा वेष बाप्पा तुम्ही घेतलाय आणि वेदसमूहातील निर्दोष अशा अक्षरसमूहाने तुमचं शरीर तयार झालंय. वेद ही ईश्वराची निर्मिती असल्याने वेदातील अक्षरं ही निर्दोष आहेत. साहजिकच श्रीगणेशाची कायाही निर्दोष आहे.
अठरा पुराणे हे तुमचे रत्नजडित अलंकार आहेत. त्या अलंकारांना जडवलेली रत्ने म्हणजे पुराणातील उत्तमोत्तम तत्वे आहेत. काव्यमय पुराणवर्णन हे या मूर्तीचे रंगीत वस्त्र असून काव्यातील विविध अलंकार हा त्या वस्त्राचा मऊसूत तंतूसमूह आहे. छंदबद्ध काव्य हे नेहमीच आकर्षक असल्याने पाठांतर करायला प्रोत्साहन मिळते. म्हणून लहानपणी पाठ केलेल्या छंदयुक्त कविता आपल्याला अजूनही लक्षात असतात. श्रीगणेशाची काव्यालंकार रुपी वस्त्रs अत्यंत आकर्षक आहेत. वस्त्राची किंमत ते कोणत्या सुतात विणलं आहे त्यावर ठरतं. पुराणातील काव्यातील विविध अलंकार हे फारच मुलायम आहेत. अशा मुलायम सुताचे मऊसूत किमती वस्त्र श्रीगणेशाने परिधान केलेले आहे.
गणेशाच्या पायातल्या रुणझुणत्या घागऱ्यांबद्दल माउली म्हणतात, रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आहेत आणि त्यात जागोजागी नाट्यापूर्ण प्रसंग ठासून भरलेले आहेत. ही काव्ये वाचत असताना त्या नाट्यापूर्ण प्रसंगांकडे आपण कौतुकाने चकित होऊन पाहात राहतो. श्रीगणेशाच्या पायात ही महाकाव्ये रुणझुणत्या घागऱ्या होऊन बसलेली आहेत आणि त्यांचा होणारा नाद म्हणजे या काव्यातला सरस अर्थ होय. रामायण महाभारतादी महाकाव्ये अतिशय अर्थपूर्ण असून वाचत असताना त्यातील लय आपणास जाणवते व वाचून झाल्यावर ती लय आपल्या मनात रुंजी घालत असते. ज्या महाकाव्याच्या घागऱ्या गणेशाने घातलेल्या आहेत. त्या महाकाव्यात अनेक महत्वपूर्ण सिद्धांत सांगितलेले आहेत. त्यांचा धांडोळा घेतल्यास अनेक सुयोग्य पदरत्ने हाती पडतात.
वरील महाकाव्ये रचणाऱ्या वाल्मिकी व व्यास यांच्या नवनवोन्मेषशालिनी बुद्धीचा शेला श्रीगणेशाच्या कंबरेला बांधलेला आहे. श्रीगणेशाच्या हाताबद्दल आणि हातातील शस्त्रांबद्दल सांगताना माऊली म्हणतात, सहा शास्त्रांनी श्रीगणेशाचे सहा हात तयार झाले आहेत. त्या हातातील शस्त्रs जरी विसंवादी असली तरी ती शोभून दिसत आहेत. मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, वेदान्त ही आपली सहा सनातन शास्त्रs आहेत. त्या शास्त्रात मांडलेले सिद्धांत परस्परविरोधी आहेत. त्यांनी एकमेकांच्या सिद्धांताचे खंडन मंडन केलेले आहे. तद्वत श्रीगणेशाच्या सहा शास्त्ररुपी हातातली शस्त्रs जरी एकमेकाशी विसंवादी असली तरी श्रीगणेशाच्या हातात शोभून दिसत आहेत. माउलींच्या मते कणादाचे अनुमान म्हणून एका हातातील परशु, गौतमिय न्यायशास्त्रात सांगितलेला सोळा पदार्थांचा तत्वभेद तो दुसऱ्या हातातला अंकुश, श्रीव्यासांनी मांडलेल्या वेदांत शास्त्रातील ब्रह्मसिद्धांत म्हणजे तिसऱ्या हातातील मोदक होय. पहिल्या तीन हातातील शस्त्रांबद्दल सांगून झाल्यावर पुढील तीन हातातील शस्त्रांबद्दल सांगताना माउली म्हणतायत, पातंजलदर्शनरुपी जो तुटका दात चौथ्या हातात आहे तो खंडित झालेल्या बौद्धमताचे प्रतिक आहे. पाचव्या हातात जो कमळ घेऊन आशीर्वाद देत असल्यासारखा पुढे येतो त्याला संख्यांचा सत्कारवाद म्हणता येईल आणि शेवटच्या अभय देत असलेला नाभिकार रूपातील हाताला धर्मसिद्धी करणाऱ्या जैमिनिकृत धर्मशास्त्र म्हणता येईल.
क्रमश:








