तीन मजली इमारत कोसळली
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील छापरा जिल्हय़ातील खोदाईबाग गावात रविवारी सकाळी 11.45 वाजता फटाक्मयांच्या कारखान्यात स्फोट झाला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. 5 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. एका तीनमजली इमारतीमध्ये फटाके बनविण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. या स्फोटानंतर इमारत कोसळली असून ढिगाऱयाखाली काही लोक गाडल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. फटाके बनवण्याचा हा कारखाना गावात बेकायदेशीरपणे चालवला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. येथील कारखान्यात फटाके बनवताना स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी खैरा पोलीस ठाणे परिसरात बॉम्ब बनवताना स्फोट झाला होता.
छापरा जिल्हय़ात एका तीन मजली इमारतीमध्ये फटाक्यांचा कारखाना चालवला जात होता. सदर इमारत फटाक्यांच्या स्फोटांमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. स्फोटाचा आवाज सुमारे 3 किमी दूर ऐकू आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मशिदीजवळ असलेल्या मोहम्मद रेयाजू मियाँ यांच्या घरात हा स्फोट झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. स्फोटाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच मदत व बचावकार्यावेळी बॉम्बशोधक पथकाचीही मदत घेतली जात आहे. ढिगारा हटवल्यानंतरच स्फोट कसा झाला हे स्पष्ट होणार आहे.









