कीटकनाशक ठरते जीवघेणे, कृषी खात्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
दमदार पावसानंतर पिके जोमाने आली आहेत. तर काही ठिकाणी पिकांवरील कीडीच्या नियंत्रणासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेतकऱयांकडून कीटकनाशक व तणनाशकांची फवारणी केली जात आहे. मात्र, यावेळी शेतकऱयांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कीटकनाशकच शेतकऱयाच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात. औषधांची फवारणी करताना योग्य खबरदारी घेऊन शेतात उतरावे, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
यंदा 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी 90 टक्के पेरणी, लागवड पूर्ण झाली आहे. दरम्यान, पेरणी आणि लागवडीनंतर तणनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे शेतकऱयांनी काळजी घेणे आवश्यक आहे. भात, बटाटा, भुईमूग, सोयाबीन, मका, रताळी वेल, नाचणा आदी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. अलीकडे कीटकनाशक आणि तणनाशक वापरणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. मात्र, बहुतांशी शेतकरी कीटकनाशक वापरण्यासंबंधी अनभिज्ञ आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱयांनी कीटकनाशक फवारणीवेळी हातमोजे, तोंडाला मास्क, वाऱयाची दिशा आदींचे पालन होणे आवश्यक आहे.
फवारणी करताना काळजी घ्या!
किटकनाशक, तणनाशक आणि टॉनिक वापरणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे औषध फवारणीवेळी शेतकऱयांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आवश्यक ती खबरदारी आणि काळजी घेऊनच शेतकऱयांनी औषधांची फवारणी करावी.
– आर. बी. नायकर, साहाय्यक कृषी अधिकारी









