वार्ताहर /धामणे
नंदिहळ्ळी येथील अशोक जाधव यांच्या शेतातील उसाच्या फडाला गुरुवार दि. 26 रोजी दुपारी दोनच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशोक जाधव यांचे नागेनहट्टी शिवाराच्या हद्दीत सर्वे नंबर 31 मध्ये एक एकर जमिनीत उसाचा फड असून या उसाच्या फडामधून हेस्कॉमने सर्व्हिस विद्युत वायर ओढून पुढील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा केला जातो. ही विद्युतभारीत तार उसाच्या फडातच तुटुन गुरुवारी दुपारी उसाच्या फडाला अचानक आग लागली. दिवसा ही घटना घडल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कसोसीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठे नुकसान होण्याचे थांबले. अन्यथा आजूबाजूच्या 10 ते 12 एकर उसाचे फड जळून खाक झाले आसते. या शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.









