सुळगे (हिं.)-बाची गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने प्रवाशांचा इशारा : रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
सुळगे (हिं.) ते बाची गावापर्यंतचा पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सुळगा केंबाळी नाल्याजवळील रस्ता, सुळगा बसस्थानक, बेळगुंदी फाटा, उचगाव फाटा आणि बाचीजवळील रस्ता खड्यातच हरवल्याने सदर ठिकाणचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. मोठमोठे खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी त्यामुळे दुचाकी वाहने या खड्यात अडकून पडून अपघाताची मालिकाच या ठिकाणी सुरू झाली आहे. तातडीने सदर खड्डे बुजवावेत, अशी मागणी हजारो प्रवाशांनी केली आहे. खड्डे येत्या आठवडाभरात बुजवले नाहीत तर रास्ता रोको करण्याचा इशारा या भागातील प्रवासी व नागरिकांनी दिला आहे. सुळगे-केंबाळी नाल्याजवळ अर्धा किलोमीटर अंतराचा संपूर्ण रस्ता खड्यातच हरवला आहे. जवळपास सहा ते सात फूट लांबीचे, चार ते पाच फूट रुंदीचे मोठमोठे खड्डेs पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसाचे पाणी खड्यात साचल्याने खड्यांचा अंदाज रात्रीच्यावेळी येत नसल्याने लहान वाहने अडकून अपघाताची मालिकाच या ठिकाणी सुरू झाली आहे. बांधकाम खात्याने तातडीने सदर खड्डेs बुजवावेत आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
बेळगुंदी फाट्याजवळील खड्डा बनला मृत्यूचा सापळा
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीक मुख्य वळणावरच भलामोठा खड्डा पडला असून अनेक वाहने या खयात जात असल्याने अपघात होत आहेत. सदर खड्डा तातडीने बुजवावा, अशी मागणी प्रवाशांतून हेत आहे.
आंबेवाडी फाट्यावरील चर बुजवा
आंबेवाडी, मण्णूर फाट्यावरील रस्त्यावर अनेक दिवसापासून चर खणली आहे. ती अद्याप योग्यप्रकारे न बुजवल्याने वाहनांना याचा दणका बसत आहे. रस्ताही याठिकाणी बराच खराब झाला आहे. तरी सदर चर बुजवावी आणि रस्ताही दुरुस्त करावा. उचगाव फाट्यानजीक रस्त्याची चाळण झाली आहे. शिनोळी फाटा ते सुळगा( हिं.) या पाच कि. मी. अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्यावरील खड्डेs तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.









