शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. वास्तविक तो जे पिकवतो त्यावरच सारे जग जगत असते. तो स्वत:ही त्यावर जगतो. आपण पिकविलेले धान्य किंवा भाजीपाला किंवा फळे इत्यादी विकून तो स्वत:चेही योगक्षेम सांभाळत असतो. म्हणून त्याला अन्नदाता म्हटले जाते. पण या अन्नदात्याची स्थिती बऱ्याचदा अतिशय नाजूक असते.

तथापि, काही शेतकरी मात्र, स्वत:च्या केवळ कष्टाने नव्हे, तर अभ्यासाने शेती व्यवसायातूनही श्रीमंत झालेले आहेत. परिस्थितीनुसार त्यांनी आपल्या शेतीच्या पद्धतीत, पिकांच्या योजनेत आणि पिकांच्या प्रकारांमध्ये परिवर्तन केलेले आहे. हवामान, ग्राहकांची मागणी, बाजारातील परिस्थिती आणि गुंतवणूक यांची सांगड व्यवस्थित घालून त्यांनी हा व्यवसाय लाभदायक बनविला आहे.
उत्तर प्रदेशातील सुजित हा असाच एक आधुनिक शेतकरी आहे. त्याने अवघ्या 10 वर्षांपूर्वी शेती व्यवसायाचा प्रारंभ केला. अभ्यासपूर्वक आणि प्रयोगशील पद्धतीने त्याने शेती केली. आज त्याच्याजवळ ‘ऑडीं’सारखीं महागडी कार आहे. ती त्याने स्वकष्टाने शेतीतून मिळविलेल्या उत्पन्नातून घेतली आहे. तो बाजारपेठेत आपली कृषी उत्पादने विकण्यासाठी किंवा काही खरेदीसाठी जातो त्यावेळी आपल्या या महागड्या मोटारीतून जातो. त्याची ही मोटार आणि तो स्वत: आजूबाजूच्या परिसरात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनले आहेत. शेती व्यवसाय लाभदायक करायचा असेल तर केवळ कष्ट उपयोगाचे नाहीत. अभ्यास, प्रयोग आणि बाजारपेठेचे उत्तम अध्ययन यांवर भर दिला पाहिजे, असे ते आवर्जून सांगतात. सर्वांसाठी त्यांचा हा अनुभव महत्वाचा ठरणारा आहे.









