ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकरप्पा यांच्या विधानामुळे राज्य काँग्रेसमध्ये खळबळ
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमध्ये पुन्हा लिंगायत मुख्यमंत्रिपदाची चर्चेला उत आला आहे. शिवाय सरकारमधील प्रमुख पदे देण्याच्या बाबतीत लिंगायत अधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचाही आरोप होत आहे. गॅरंटी योजना राबविताना तारेवरची कसरत करावी लागलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चिंतेत यामुळे भर पडण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारवर पक्षातूनच जातीय राजकारणाचा आरोप केला जात आहे. सरकारमध्ये लिंगायतांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. त्यांना प्रमुख पदे मिळत नसल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते शामनूर शिवशंकरप्पा यांनी केला आहे. शिवशंकरप्पा हे अखिल वीरशैव-लिंगायत महासभेचे अध्यक्षही आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधील तिकीट वंचितांना काँग्रेसमध्ये आणण्यात त्यांचाही वाटा मोलाचा होता. असे असताना त्यांनीच थेट सरकारवर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
बेंगळूरमधील वीरशैव महासभेच्या एका कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये लिंगायतांना दुर्लक्षित केले जात आहे. लिंगायत अधिकाऱ्यांना प्रमुख पदे दिली जात नाहीत, अशी खंत व्यक्त केली. तसेच लिंगायत मुख्यमंत्री असावा, असा मनोदयही व्यक्त केला आहे. सिद्धरामय्या सरकार भेदभाव करत आहे. सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर आमच्या समुदायांना स्थान देण्यात आलेले नाही. उपमुख्यमंत्रिपद घेऊन काय करायचे?, झाले तर मुख्यमंत्रीच बनावेत, असे त्यांनी सांगितले. लिंगायत नेत्यालाही उपमुख्यमंत्रिपद द्यावे, अशा मागणीविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शामनूर शिवशंकरप्पा यांनी ही भूमिका मांडली. शिवाय त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थनही केले आहे.
शिवशंकरप्पांशी चर्चा करेन : डी. के. शिवकुमार
शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलेल्या विधानाविषयी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, शिवशंकरप्पा यांनी कोणत्या कारणास्तव विधान केले आहे, याविषयी त्यांच्याशी चर्चा करेन. लिंगायत अधिकाऱ्यांची स्थिती आणि लिंगायतांना मुख्यमंत्रिपदाविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी आपल्याला समजलेले नाही. याविषयी माहिती घेऊन चर्चा करेन, असेही शिवकुमार यांनी सांगितले.
सर्व समुदाय सरकारसोबत
काँग्रेस पक्षाला सर्व समुदायांचा पाठिंबा मिळाला आहे. पक्ष केवळ एकाच समुदायामुळे सत्तेवर आलेला नाही. सर्व समुदाय सरकारसोबत आहेत. शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलेले विधान आपल्या ध्यानात आले आहे. यापूर्वी लिंगायत समुदाय काँग्रेससोबत नसल्याची चर्चा होती. आता अशी चर्चा होत नाही.
– लक्ष्मी हेब्बाळकर, महिला-बालकल्याणमंत्री









