झाडशहापूर येथे तब्बल अडीच तास रास्तारोको : सुपीक जमिनी न देण्याचा निर्धार
वार्ताहर /किणये
प्रस्तावित रिंगरोडविरोधात झाडशहापूर येथे सोमवारी शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आपली सुपीक जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला असून प्राण गेला तरी शेती देणार नाही, असे ठणकावून प्रशासनाला शेतकऱ्यांनी सांगितले. रिंगरोडविरोधात तालुक्मयातील शेतकरी तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून बळीराजाचा प्रशासनाच्याविरोधात एल्गार दिसून आला.
रिंगरोडविरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील झाडशहापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून बळीराजाने आपली एकजूट दाखवून दिली आहे. रिंगरोड प्रकल्प रद्द करावा अन्यथा याहूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. तालुक्मयाच्या मुख्य महामार्गांवर मोर्चा काढण्याचा इशाराही म. ए. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी दिला.
सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान झाडशहापूरजवळ तालुक्मयातील शेतकरी जमू लागले. शेतकरी बैलगाड्या व जनावरांसह मोर्चात सहभागी झाले. सकाळी 11.30 च्या दरम्यान झाडशहापूर येथील हनुमान मंदिरात भजनी मंडळाच्यावतीने पूजन करून मोर्चाला सुऊवात झाली. यावेळी झाडशहापूरमधील प्रमुख पंचमंडळींच्या हस्ते ब्रम्हलिंग देवाचे पूजन करून मोर्चाला सुऊवात करण्यात आली.
तालुक्मयातील 32 गावांतील सुमारे 1300 एकर जमीन रिंगरोड प्रस्तावात आहे. यामध्ये झाडशहापूर गावातील बहुतांशी शेतजमीन रिंगरोडमध्ये जाणार आहे. त्यामुळे झाडशहापूर हे गावच उद्ध्वस्त होणार आहे. कसण्याला शेती आणि रहायला घरही उरणार नाही. त्यामुळे झाडशहापूरवासियांची झोपच उडाली आहे. प्राण गेला तरी आपली जमीन देणार नाही, असा झाडशहापूरसह परिसरातील शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे.
रिंगरोडला पिकाऊ जमीन घेतल्यास इथला भूमीपूत्र भूमिहीन होणार आहे. त्यामुळे रिंगरोडविरोधी मोर्चात शेतकरी आक्रमक झाला असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.
जनावरांसह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘देणार नाही, देणार नाही, आमची सुपीक जमीन देणार नाही’ अशा घोषणा या मोर्चात महिला व शेतकऱ्यांनी दिल्या. राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्या व जनावरांसह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. सकाळी 11.30 वाजता मोर्चाला सुऊवात झाली.
माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, परशराम कोलकार, भागोजी पाटील सविता गोरल, रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी, प्रकाश अष्टेकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, आर. एम. चौगुले, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, रयत शेतकरी संघटनेचे प्रकाश नायक आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी अशोक मण्णीकेरी हे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी म. ए. समितीच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांना पाहून महिलांनी आपल्या जमिनी देणार नाही, असा आक्रोश केला. निवेदन स्वीकारून आपण तुमचे निवेदन वरिष्ठांना देऊन तुमच्या मागणीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन अधिकारी मण्णीकेरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
यावेळी अॅड. एम. जी. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. शाम पाटील, प्रकाश मरगाळे, अॅड. प्रसाद सडेकर, आर. के. पाटील, आर. आय. पाटील, पुंडलिक पावशे, एस. एल. चौगुले, कृष्णा हुंदरे, रमाकांत कोंडुसकर, माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे, रावजी पाटील, सतीश पाटील आदींसह तालुक्मयाच्या विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तब्बल अडीच तास रास्तारोको
या मोर्चात तळपत्या उन्हात महिला व झाडशहापूरमधील लहान बालके विद्यार्थीही सहभागी झाले होते. उन्हाची तमा न बाळगता अडीच तास महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. झाडशहापूरजवळ तसेच देसूर, वाघवडे क्रॉस, येळ्ळूर-देसूर क्रॉस रस्त्यावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आडवे लावून रास्तारोको करून आपली तळमळ दाखवून दिली. यावेळी काही पोलीस वाघवडे येथील तऊणांना तुम्ही वाहने बाजूला घ्या, असे म्हणत असताना या शेतकरी तऊणांनी आम्ही रास्तारोको आंदोलन केले, प्रशासनाला जाग आणण्यासाठीच हा आमचा प्रयत्न आहे, असे पोलिसांना ठणकावून सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनामार्फत झाडशहापूर येथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.









