लोकमान्य सोसायटीचा उपक्रम : आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलचे सहकार्य : हेरवाडकर शाळेच्या पटांगणावर आयोजन : आज-उद्या सर्वांसाठी खुले
बेळगाव : दिवाळीच्या आनंदाबरोबरच परस्परांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी, हस्तकलेला प्राधान्य मिळावे आणि विक्री कौशल्याचे आकलन व्हावे या हेतूने लोकमान्य सोसायटीच्या पुढाकाराने व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले. हेरवाडकर शाळेच्या पटांगणावर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन एसकेई सोसायटीचे पदाधिकारी ज्ञानेश कलघटगी यांच्या हस्ते व लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, एसकेईचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये एम. व्ही. हेरवाडकर, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, स्वाध्याय विद्या मंदिर व जे. एन. भंडारी स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, शानभाग हायस्कूल या एसकेई संस्थेच्या शाळांचा सहभाग आहे.
दरवर्षी उत्तम प्रतिसाद
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आकाश दिवे, पणत्या, तोरण, लक्ष्मीचे मुखवटे, सजावटीच्या वस्तू आणि फराळाचे साहित्य मांडले आहे. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विक्री व्यवस्थापनाचे कौशल्य शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, या हेतूने लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी हा उपक्रम राबविला असून दरवर्षी त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पंढरी परब म्हणाले, आपल्याला गुरुंचे किंवा ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळते तेव्हा आपल्याला हुरुप येतो आणि आपण अनेक उपक्रम राबवू शकतो. दरवर्षी हे प्रदर्शन भरत असून त्याला वाढता प्रतिसाद आहे, या मागे किरण ठाकुर यांचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य एम. बी. हुंद्रे, हेरवाडकर शाळेचे प्राचार्य सुनील कुसाणे, लोकमान्य सोसायटीचे समन्वयक राजू नाईक तसेच आयसीआयसीआयचे रिलेशनशीप मॅनेजर सुमित साळगावकर उपस्थित होते. अरुण पाटील व शेख यांनी पाहुण्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सुहास काकतकर यांनी आभार मानले.
आवर्जुन भेट द्या
प्रदर्शन बुधवार व गुरुवारी दुपारी 4 ते 8 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. बेळगावकरांनी या प्रदर्शनाला आवर्जुन भेट देऊन खरेदी करावी व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.









