दिव्यांवर घुंगरू-टिकल्यांचा ट्रेंड : महिलांकडून खरेदीसाठी लगबग
बेळगाव : दिवाळी केवळ चार-पाच दिवसांवर आल्याने दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ बहरली आहे. बाजारात प्रकाशाचा झगमगाट करणारे दिवे आणि पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध आकारांमध्ये डिझाईन आणि रंगीबेरंगी पणत्या आणि दिवे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीला वसुबारसपासून सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर बाजारात विविध साहित्याबरोबर आकर्षक दिवे आणि पणत्यांची विक्री होऊ लागली आहे. त्याबरोबरच आकाश कंदील, मेणबत्त्या, रांगोळी, मातीचे दिवे, तोरण, शुभ-लाभ, लक्ष्मीची पाऊले आदी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. विविध साहित्यांनी दुकाने सजली आहेत.
विशेषत: विविध आकारांमध्ये पणत्या आणि दिवे मिळू लागले आहेत. पारंपरिक मातीच्या पणत्या आणि दिव्यांबरोबर तामिळनाडू येथील पणत्या आणि सिरॅमिकच्या पणत्या दाखल झाल्या आहेत. या आकर्षक पणत्यांना अधिक पसंती दिली जात आहे. मातीच्या पणत्या 20 ते 30 रु. डझन, तामिळनाडूच्या पणत्या 20 ते 100 रु. डझन, सिरॅमिकच्या पणत्या 50 ते 100 रु. डझन असा दर आहे. लहान-मोठ्या आकारात सर्व प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याबरोबरच टिकल्या आणि घुंगरू लावलेल्या पणत्यांनी आकर्षण वाढवले आहे. महिलांकडून या नवीन ट्रेंडच्या पणत्या खरेदी केल्या जात आहेत. लहान पणत्यांचे दर कमी असले तरी इतर सिरॅमिक पणत्यांचे दर 100 रुपयांच्या पुढे आहेत. वाहतूक खर्च, रंग, मजुरी आदींच्या दरात वाढ झाल्याने पणत्यांचे दर वाढले आहेत.
बाजारात आकर्षक पणत्यांचा ट्रेंड
बाजारात यंदा विविध आकर्षक पणत्यांचा ट्रेंड निर्माण झाला आहे. पणत्यांवर टिकल्या आणि घुंगरू लावून विक्री होऊ लागली आहे. शिवाय महिला वर्गाकडून या पणत्या खरेदी केल्या जात आहेत. पारंपरिक पणत्यांबरोबर रंगीत साज चढवलेल्या पणत्यांनाही मागणी वाढू लागली आहे.
दिवाळीच्या किल्ल्यांसाठी प्रतिकृतींना मागणी
दिवाळी अगदी जवळ आल्याने किल्ले बनविण्यासाठी बालचमू मग्न झाले आहेत. त्याचबरोबर किल्ले, मावळ्यांच्या प्रतिकृती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विविध मंदिरे, शिवरायांच्या प्रतिकृती, मावळे, बुरुज विविध ठिकाणी विक्री होवू लागले आहेत. पारंपरिक पद्धतीने आकर्षक गड-किल्ले उभारले जात आहेत. शिवरायांचा जीवंत देखावा सादर करण्यासाठी शिवभक्तांची धडपड सुरू आहे. त्यामुळे बाजारात शिवरायांच्या विविध प्रतिकृतींना मागणी वाढू लागली आहे.









