बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपी
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेयर
अंदमान आणि निकोबार बेटसमुहाचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नारायण यांना कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेयर खंडपीठाने सोमवारी जामीन मंजूर केला आहे. नारायण यांच्यावर 21 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. न्यायाधीश चित्तरंजन दास आणि मोहम्मद निजामुद्दीन यांच्या खंडपीठाने नारायण यांना सशर्त जामीन दिला आहे. तर जामिनाच्या आदेशाच्या विरोधात पीडितेचे वकील पथिक चंद्रदास हे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. जामिनाच्या अटींनुसार नारायण यांना अंदमान आणि निकोबार बेटसमुहात प्रवेश करता येणार नाही. तसेच साक्षीदारांना प्रभावित करण्यासाठी अधिकाऱयांचा वापर करता येणार नाही. याचबरोबर केंद्रशासित प्रदेशातील कुठल्याही अधिकाऱयाला आणि पीडितेला फोन करण्यास मनाई करण्यात आली आहे. नारायण यांना स्वतःचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांची एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे. शासकीय नोकरीचे प्रलोभन दाखवून मुख्य सचिवांसह अन्य काही जणांनी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एसआयटीने चालू महिन्याच्या प्रारंभी याप्रकरणी 935 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.









