ता. पं.-जि. पं.-कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं.चे दुर्लक्ष : ग्रामसभा घेऊन विकासकामांना चालना देण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
तालुक्यामध्ये ए ग्रेड ग्रा. पं. म्हणून कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कडे पाहिले जाते. परंतु या ग्रामपंचायतीची चार वर्षात एकही ग्रामसभा झाली नाही. याला जबाबदार शासकीय अधिकारी की ग्रा. पं. सदस्य? अशीही चर्चा होत आहे. नवीन अधिकारी येत आहेत, जात आहेत. परंतु एकही अधिकारी ग्रामसभा घेऊन गावचा विकास करण्याचे धाडस करत नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा ता. पं., जि. पं. अधिकारी, या भागाचे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन त्वरित ग्रामसभा घेऊन गावच्या खुंटलेल्या विकासाला चलना देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतमध्ये 34 सदस्य संख्या आहे. गावची लोकसंख्या 25 हजारच्या घरात आहे. परंतु एवढी लोकसंख्या सांभाळणाऱ्या ग्रा. पं. ची गेल्या चार वर्षांपासून ग्रामसभा झाली नाही, ही खेदाची बाब आहे. ग्रा. पं. निवडणुका झाल्यापासून तीन चेअरमन व तीन व्हा. चेअरमन झाले. सदस्यांना गावच्या विकासापेक्षा चेअरमन बदलण्यामध्येच अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. परंतु अधिकारी किंवा कुणी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही हे गावचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशाही प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याकडे दुर्लक्ष
गावापासून अवघ्या तीन कि.मी.वर बेळगाव शहर आहे. बेळगावला जाताना शाहूनगरची वस्ती आहे. गावच्या रस्त्याचे डांबरीकरण होऊन पाच-सहा वर्षे झाली. सध्या रस्ता करणे अगदी गरजेचे आहे. परंतु कुणीही रस्ता करून देण्याकडे धजत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण आमदारांनी इकडे लक्ष देऊन कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
सरकारी दवाखाना, भाजीमार्केटचे उद्घाटन कधी?
गोरगरीब सर्वसामान्य गरजू नागरिकांना गावमध्येच वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून लाखो रुपये खर्चुन मरगाईनगरमध्ये सरकारी दवाखाना बांधून दोन वर्षे झाली. परंतु अजून उद्घाटन झाले नाही. तसेच जुन्या ग्रा. पं. समोर भाजीमार्केटचीही इमारत बांधून वर्ष झाले. तीही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे शासनाने लाखो रुपये खर्चून इमारत बनवूनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही. यामुळे कंग्राळी बुद्रुकला कुणी वाली आहे की नाही, ग्रा. पं. मधील अधिकारी तसेच ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य या सर्वांचे लक्ष आहे की नाही. ग्रा. पं. असून हरकत नसून खोळंबा…या म्हणीप्रमाणे झाली असून गावच्या विकासासाठी आता नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागेल, अशाही प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून उमटत असल्याचे दिसून येत आहे.
24 तास नळपाणी योजना बारगळली
शासनाकडून गावोगावी घरोघरी 24 तास नळपाणी योजना सुरू केल्या आहेत. परंतु कंग्राळी बुद्रुकमधील घरोघरी 24 तास नळपाणी योजना अजून पूर्ण झालीच नाही. अजून अर्धे गाव पाण्याविना तसेच आहे. नागरिकांना रोज ताजे पाणी केव्हा मिळणार, या आशेकडे नागरिक लक्ष देऊन आहेत. परंतु पंचायत सदस्यांना याकडे वेळ नसल्याचेही दिसून येत आहे.









