उद्दिष्ट गाठण्यासाठी जि. पं. कडून ता. पं. ला सूचना
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेतून विकासकामे राबवून नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पंचायतीकडून प्रत्येक तालुका पंचायतीला दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी कडक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबविण्यात हुक्केरी तालुका आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर चिकोडी, तिसरा क्रमांकावर कित्तूर त्यानंतर रामदुर्ग तालुक्याचा समावेश आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी नागरिकांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी सरकारकडून रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला आहे. प्रत्येकाला 150 दिवस रोजगार मिळावा, यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकारकडून जिल्हा पंचायतीला सूचना करण्यात आली आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांना येत्या मार्चपूर्वी रोजगाराचे उद्दिष्ट गाठणे भाग पडले आहे. राज्य सरकारकडून 16 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी रोजगार हमी योजनेंतर्गत सरकारकडून देण्यात आलेला निधी खर्च करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी तालुका पंचायत अधिकाऱ्यांची जि. पं. अधिकाऱ्यांकडून नुकतीच बैठक घेण्यात आली आहे. सदर बैठकीत सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये हुक्केरी तालुक्याने 97.21 टक्के उद्दिष्ट गाठले आहे. चिकोडी तालुका 94.75 टक्के, कित्तूर तालुका 88.89 टक्के, रामदुर्ग 88.61 टक्के, सौंदत्ती 86.44 टक्के, गोकाक 85.11 टक्के, बेळगाव 84.19 टक्के, मुडलगी 82.03 टक्के, बैलहोंगल 83.52 टक्के, अथणी 75.23 टक्के, खानापूर 71.63 टक्के, रायबाग 65.88 टक्के, निपाणी 38.97 टक्के, कागवाड 36.52 टक्के उद्दिष्ट गाठले आहे.









