वेतनात वाढ, कामगारांना दिलासा
बेळगाव : अकुशल कामगारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या वेतनात वाढ झाली आहे. 349 वरून प्रतिदिवस मजुरी 370 रुपयांवर गेली आहे. 1 एप्रिलपासून रोहयोमधील कामासाठी मजुरांना प्रतिदिन 21 रुपये अधिक मिळणार आहेत. जिल्ह्यात रोहयो कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अलीकडे नवीन जॉब कार्डचे वितरण झाल्याने कामगारांच्या संख्येत भर पडली आहे. केंद्र सरकारने 2005 पासून योजना सुरू केली आहे. याअंतर्गत एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगाराच्या हाताला काम उपलब्ध होऊ लागले आहे. या योजनेंतर्गत मागील वर्षी कामगारांच्या मजुरीत 33 रुपयांनी वाढ झाली होती. पुन्हा 2025 या वर्षात प्रतिदिवस 21 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात रोहयोंच्या मजुरीत 54 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दिलासा मिळाला आहे.
दिव्यांगाना जॉब कार्डचे वितरण
विशेषत: या योजना दिव्यांगाना सामावून घेण्यासाठी अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत इच्छुक दिव्यांगाना नवीन जॉब कार्डचे वितरण केले जात आहे. अशा कामगारांना हालक्या भाराची कामे दिली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांबरोबर रोहयोअंतर्गत दिव्यांग कामगारही दिसणार आहेत. रोहयो अंतर्गत तलाव, गटारी, नाले, रस्ते, आणि इतर कामांना प्राधान्य दिले जातात. विशेषत: अनेक तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तसेच पडीक जमिनीत नवीन तलाव निर्मितीला चालना दिली जाते. त्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढू लागला आहे. शिवाय नद्या स्वच्छता आणि गाळ काढण्याचे कामही हाती घेतले जात आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार कामगारांना कामे उपलब्ध होऊ लागली आहेत.
अधिक दिवस काम देण्यासाठी प्रयत्न
रोहयो अंतर्गत विशेष अभियान राबवून दिव्यांग व्यक्तींना जॉब कार्डचे वितरण केले जात आहे. शिवाय आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रथमोपचार कीट, पाणी बॉटल वाटप केले जात आहे. कामगारांना अधिक दिवस काम देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंदा चालू वर्षात मजुरीतही 21 रुपयांची वाढ झाली आहे.
– रवि बंगरेपन्नावर, जि. पं. योजना अधिकारी









