अमेरिका पार्टी ठेवले नाव : रिपब्लिकन अन् डेमोक्रेट भ्रष्ट असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी अमेरिकेत राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी या पक्षाचे नाव ‘अमेरिका पार्टी’ ठेवले आहे. अमेरिका पार्टीची स्थापना करत नागरिकांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मस्क यांनी एक्सवर राजकीय पक्षासाठी पब्लिक पोलही केला होता. या पोलमध्ये 66 टक्के लोकांनी नवा राजकीय पक्ष स्थापन व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. रिपब्लिकन अन् डेमोक्रेटिक हे दोन्ही पक्ष भ्रष्ट आहेत. अमेरिकेला 2 पार्टी सिस्टीमपासून मुक्तता मिळणार असल्याचा दावा मस्क यांनी केला.
अमेरिकेत 150 वर्षांपासून डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन पक्षांचाच दबदबा राहिला आहे. अध्यक्षीय निवडणुकीपासून प्रांतीय निवडणुकांमध्ये दोनच पक्षांचे वर्चस्व आहे. या टू-पार्टी सिस्टीमला अमेरिकेच्या लोकशाहीच्या स्थिरतेचे कारणही मानले जाते. डेमोक्रेटिक पार्टीची सुरुवात 1828 मध्ये एंड्रू जॅक्सन यांच्या काळात झाली. हा पक्ष प्रारंभी शेतकरी आणि सर्वसामान्यांचा पक्ष मानला जायचा. 20 व्या शतकात हा पक्ष सामाजिक कल्याण, आर्थिक सुधारणा आणि नागरी अधिकारांसाठी आग्रही राहिला. तर रिपब्लिकन पार्टी 1854 मध्ये गुलामीच्या विरोधात निर्माण झाला होता. 20 व्या शतकात हा व्यापार अन् शुल्कपातीचे समर्थन करणारा पक्ष ठरला.
तिसरा पक्ष का यशस्वी नाही?
अमेरिकेत अनेकदा तिसरा पक्ष निर्माण करण्यात आला, परंतु यशस्वी होऊ शकला नाही. 1912 मध्ये अध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांनी बुल मूस पार्टी निर्माण करत 88 इलेक्टोरल व्होट मिळविली होती. परंतु पक्ष पुढील निवडणुकीपर्यंत टिकू शकला नाही. 1992 साली रॉस पेरोट यांनी 19 टक्के लोकप्रिय मते मिळविली, परंतु इलेक्टोरल व्होट मिळविता आले नाही. या पक्षांना आर्थिक सहाय्य, संघटन आणि प्रसारमाध्यमांमध्ये स्थान मिळत नाही. तसेच मतदारही त्यांना मते खाणारा मानतात. याचमुळे लिबर्टेरियन किंवा ग्रीन पार्टी यासारखे पक्षही अध्यक्षीय निवडणुकीत 3-4 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवू शकले नाहीत. तसेच निवडणूक व्यवस्था हा तिसरा पक्ष यशस्वी न ठरण्यामागील मोठे कारण आहे.









