नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी तब्बल 44 अब्ज डॉलर्स रोख मोजून ट्विटर ही लोकप्रिय सोशल मिडिया कंपनी विकत घेतली आहे. सोमवारी ट्विटरनेही याला दुजोरा दिला. त्यामुळे आता ही कंपनी ‘खासगी’ झाली आहे. या व्यवहारावर जगभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मस्क हेच ट्विटरसंबंधी उपाय करण्यास समर्थ आहेत. त्यांना ही योग्य संधी मिळाली आहे. ते स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरुन या कंपनीची भरभराट करतील, अशी भलावणही त्यांनी केली. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी शंका उपस्थित केली आहे. मस्क यांच्या टेल्सा कंपनीचे चीनशी संबंध आहेत. आता चीनचा शब्द ट्विटरमध्ये चालणार का, अशी शंका लोकांना आहे, अशा अर्थाचे एक वक्तव्य त्यांनी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात केले आहे. एलॉन मस्क स्वतःला मुक्त विचार अभिव्यक्तीचे खंदे समर्थक मानतात. त्यांच्या या भूमिकेचा ट्विटरवर कोणता परिणाम होईल, हे येत्या काही काळात समजणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.
भारतावर परिणाम ट्विटरची मालकी मस्क यांच्याकडे जाण्यापूर्वी भारत सरकारचे आणि ट्विटरचे मतभेद झाले होते. काही केंद्रीय मंत्र्यांची आणि भाजप नेत्यांची ट्विटर खाती काही काळापुरती बंद करण्यात आली होती. या नेत्यांचे ट्विटरवर टाकलेले संदेश आक्षेपार्ह मानण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला नियमांमध्ये परिवर्तन करण्याचा आदेश दिला होता. तसेच काही अटी घातल्या होत्या. आता मस्क मालक झाल्यानंतर हे संबंध कसे राहतात हे काही काळात समजणार आहे.









