मागील सामन्यातील नोबॉलचा वाद मागे सारत नव्याने सुरुवात करण्याचे दिल्लीचे लक्ष्य
मुंबई / वृत्तसंस्था
मागील लढतीतील नोबॉलचा वाद मागे टाकत आता केकेआरविरुद्ध नव्याने सुरुवात करण्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाचा भर असेल. दिल्ली-केकेआर यांच्यात आज (गुरुवार दि. 28) सायंकाळी 7.30 वाजता आयपीएल साखळी लढत होत असून सहायक प्रशिक्षक प्रवीण आमरे एका सामन्यासाठी निलंबित असतील. दिल्लीला मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढतीत 15 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग मागील लढतीत सक्तीच्या क्वारन्टाईनमुळे उपलब्ध नव्हते. या लढतीत ते दिल्लीच्या पथकात परतलेले असतील. दिल्लीचा संघ 7 सामन्यात 3 विजयांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे तर केकेआर सलग चार पराभवांमुळे आठव्या स्थानी फेकला गेला आहे.
दिल्लीच्या फलंदाजी लाईनअपमध्ये डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिषभ पंत व पॉवेल यांच्यासारखे धडाकेबाज पर्याय उपलब्ध असून साहजिकच, केकेआरच्या गोलंदाजांना दक्ष राहणे भाग असेल. सलग तीन अर्धशतके झळकावल्यानंतर वॉर्नर रॉयल्सविरुद्ध अपयशी ठरला होता. आता आणखी एक दमदार डाव साकारण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. पृथ्वी शॉ देखील उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल.
सर्फराज खानबद्दल निर्णयाची प्रतीक्षा
तिसऱया क्रमांकावरील दिल्लीचा नवा पर्याय सर्फराज खान यापूर्वी अपयशी ठरला असून त्याची संघातील जागा अबाधित राहणार का, हे आज नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. अष्टपैलू ललित यादव, शार्दुल ठाकुर व अक्षर पटेल यांच्या बरोबरीने रिषभ पंतला देखील अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. पंतकडे एकहाती सामना फिरवण्याची ताकद आहे. मात्र, अद्याप तो इतक्या ताकदीने खेळलेला नाही. वानखेडेवरील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असते. याचा पंतला लाभ घेता येणार का, हे आज प्रत्यक्ष सामन्यात स्पष्ट होईल. पॉवेलचे उत्तुंग षटकार खेचण्याचे कौशल्य देखील दिल्लीचे बलस्थान असेल.
दिल्लीची गोलंदाजी उत्तम होत आली आहे. मात्र, जोस बटलरने केलेली धुलाई विसरुन त्यांना येथे नव्याने सुरुवात करावी लागेल. खलील अहमद ठरावीक अंतराने ब्रेकथ्रू मिळवून देण्यात यशस्वी ठरत आला असून मुस्तफिजूर त्याला समयोचित साथ देत आला आहे. कुलदीप यादव बहरात परतला असून अक्षर व ललित यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. या त्रिकुटाने आतापर्यंत एकत्रित 20 बळी घेतले असून येथे आजच्या लढतीतही त्यांची 12 षटके महत्त्वाची ठरणार आहेत.
संभाव्य संघ
कोलकाता नाईट रायडर्स ः श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अश्विन हेब्बार, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, पृथ्वी शॉ, रोव्हमन पॉवेल, ऍनरिच नोर्त्झे, चेतन साकरिया, खलील अहमद, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजूर रहमान, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिशेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सर्फराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, केएस भरत, टीम सेफर्ट.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
केकेआरला ‘परफेक्ट कॉम्बिनेशन’ची आवश्यकता
कोलकाता नाईट रायडर्सला उत्तम संघबांधणी करता येणार का, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. कर्णधार श्रेयस अय्यरसह आघाडीवीरांची फलंदाजी उत्तम होणे देखील अर्थातच महत्त्वाचे असेल. श्रेयस अय्यर मागील लढतीत अपयशी ठरला. त्याचप्रमाणे सलामीवीर सॅम बिलिंग्ज, सुनील नरेन देखील अपेक्षापूर्ती करु शकले नाहीत. याच सलामीवीरांसह उतरण्याचा निर्णय झाला तर या जोडीला अधिक आक्रमणावर भर देणे भाग असेल.
श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग व वेंकटेश अय्यर यांच्यासमोर प्रामुख्याने दिल्लीच्या फिरकीपटूंचे कडवे आव्हान असणार आहे. वेंकटेश अय्यरला मधल्या फळीत तळाच्या स्थानी पाठवले जात असले तरी ही रणनीती अद्याप फारशी फळलेली नाही. उमेश यादव व टीम साऊदी हे केकेआरचे जलद गोलंदाज मात्र त्या तुलनेत भरीव योगदान देत आहेत. वरुण चक्रवर्तीला अद्याप सूर सापडलेला नाही, ही देखील केकेआरची चिंता राहिली आहे.









