केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, अजित पवार यांचा विमानतळावरून प्रवास
बेळगाव : निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रात असली तरी बेळगावमध्ये त्याचे परिणाम नेहमीच दिसत असतात. महाराष्ट्राच्या सीमा बेळगावला लागून असल्यामुळे स्टार प्रचारक बेळगावमध्ये येऊन कोल्हापूर जिल्ह्यात जात आहेत. यामुळे बेळगाव विमानतळावर मागील महिन्याभरात विशेष विमाने येण्याची संख्या वाढल्याचे दिसून आले. बेळगावच्या सांबरा विमानतळावर मागील महिन्याभरात अनेक मंत्री तसेच खासदार दाखल झाले. विशेष विमानांनी हे मान्यवर दाखल झाल्याने विमानतळावर स्वतंत्र व्यवस्था करावी लागली. काहीवेळा हे मान्यवर आपली सभा संपवून पुन्हा विमानतळावर येईपर्यंत विमानाचे पार्किंग करण्यात आले. यामुळे निवडणुका जरी महाराष्ट्रात असल्या तरी विशेष विमानाच्या फेऱ्या बेळगावमध्ये झाल्याचे चित्र पहायला मिळाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक स्ट्रार प्रचारक विमानाने बेळगावमध्ये आले होते. बेळगाव विमानतळावरून चंदगड, गडहिंग्लज, आजरा या मतदारसंघात पोहोचणे सोयीचे ठरत असल्याने बेळगावला पहिली पसंती देण्यात आली. बेळगावमधून मुंबई, दिल्ली यासह इतर शहरांना विमानसेवा उपलब्ध असल्याने प्रचारासाठी पक्षाचे नेते बेळगावमध्ये येऊन महाराष्ट्रातील मतदारसंघात पोहोचत होते.
अजित पवारांची बेळगावला धावती भेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सायंकाळी बेळगावला धावती भेट दिली. चंदगड मतदारसंघाचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ नेसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी पवार उपस्थित होते. विशेष विमानाने ते बेळगाव विमानतळावर दाखल झाले. काही वेळ थांबून ते नेसरीच्या दिशेने रवाना झाले. यावेळी विमानतळावर उपस्थित मराठी भाषिकांशी त्यांनी संवाद साधला.









