वृत्तसंस्था / .थिरुवनंतपुरम
अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘एम्पुरान’ या चित्रपटाचे निर्माते ए. एम. गोपालन यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. सोमवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या कार्यालयावर ईडीने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याने ही चौकशी करण्यात आली आहे.
गोपालन यांच्या कार्यालयात दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम सापडली होती. ती ईडीने जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची आणि कोठून आणण्यात आली होती, इत्यादी प्रश्न गोपालन यांना विचारण्यात आले होते. गोपालन यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तथापि, हा वाद संपलेला नाही.
चित्रपटावर आरोप
एम्पुरान या चित्रपटात 2002 च्या गुजरात दंगलींचे विकृत चित्रण केले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. गोपालन यांची कंपनी असून या कंपनीने चिट पंडच्या नावाखाली लोकांकडून प्रचंड रक्कम जमा केली आहे, असा आरोप करण्यात आला होता. या कंपनीने अशा प्रकारे 371.80 कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात, तर 220.74 कोटी रुपये चेक्सचा माध्यमातून गोळा केले असून या पैशांचा अपहार केला आहे, असाही ईडीचा आरोप आहे.









