संविधान संरक्षण परिषदेत राहुल गांधी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ .पाटणा
बिहारमध्ये संविधान संरक्षण परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी बिहारचा चेहरा बदलण्यावर भाष्य केले. गरीब आणि दुर्बल, ईबीसी, ओबीसी, गरीब आणि दलित यांना एकत्र करून आणि त्यांचा आदर करून पुढे जाणे ही काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेस पक्षाने बिहारमध्ये ज्या वेगाने आणि ताकदीने काम करायला हवे होते त्या वेगाने काम केले नाही. आम्हाला आमची चूक समजली असून आता न थांबता, आम्ही बिहारमधील गरीब, दुर्बल, ओबीसी, ईबीसी, दलित आणि महादलितांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने पुढे जाऊ, असेही ते म्हणाले.
संविधान हे भारतातील सत्याचे रक्षक आहे. भगवान बुद्ध, गुरु नानक, कबीर अशा महापुरुषांचा भारत आदर करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांसाठी लढले. त्यांनी दलितांचे दु:ख समजून घेतले आणि नंतर त्यांनी लढाई लढली, असे राहुल गांधी म्हणाले. आम्हाला बिहारचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे. बिहारमध्ये जे काही घडले आहे आणि आज बिहारमध्ये जे काही घडत आहे त्यात मोठे बदल आवश्यक आहेत. बिहारमध्ये सध्याच्या एनडीए सरकारविरोधात आम्ही लढत असून येत्या निवडणुकीत त्यांना पराभूत करणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.
तेलंगणातील जात जनगणना पारदर्शक असल्याचे सांगून ते म्हणाले की, तेथील संपूर्ण जातीचा डेटा आमच्या हातात आहे. अनेक लोक जातीय जनगणना करू नये असे म्हणत असताना आम्हाला देशभरात जातीय जनगणना व्हावी असे वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले. जातीय जनगणना हे एक क्रांतिकारी पाऊल असून त्यातून देशाचे सत्य समोर येईल, असेही ते पुढे म्हणाले.









