कोल्हापूर / इम्रान गवंडी :
पावसाने उघडिप दिल्यानंतर आता नागरिकांना रस्त्यांवरील धूळ, खडी आणि खड्डे अशा तिहेरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोट्यावधी रूपये खर्चून केलेल्या रस्त्यावरील डांबर गायब होऊन खडी वर आली आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे.
खड्ड्यांमुळे हाडे खिळखिळी, रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे आपघाताचा धोका तर रस्त्यावरून सतत उडणाऱ्या धुळीमुळे श्वसन, त्वचा, डोळे आणि घशांच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोल्हापुरचे रस्ते आहेत की मृत्यूचा सापळा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील नव्याने केलेल्या रस्त्यांचा दर्जा तपासावा, यात काही दोष आढळल्यास संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
- डांबरावर डल्ला मारला कोणी..?
अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची आवस्था पाहून डांबरावर डल्ला मारला कोणी? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, सीपीआर चौक, गंगावेश, लक्ष्मीपुरी, संभाजी नगर, राजारामपुरी, गोखले कॉलेज, खरी कॉर्नर, पद्माराजे उद्यान आदी भागासह सर्वच रस्त्यावरील खडी वर आली आहे.
- आजारांचा धोका वाढतोय
खडी आणि मातीमुळे रस्त्यांवर धूळ साचत आहे. रस्त्यांवर साचलेली धूळ वाहनांच्या रहदारीमुळे हवेत उडत आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, त्वचेचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि घशातील खवखव यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. धुलीकणांमुळे दमा, अस्थमा व श्वसनाशी निगडित रूग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
- धुळीमुळे उद्भवणारे आजार
श्वसनाचे आजार: सतत खोकला, शिंका येणे, नाक गळणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसात जळजळ किंवा संसर्गाचा धोका.
त्वचेचे आजार: त्वचेवर लाल चट्टे, खाज सुटणे, कोरडी त्वचा किंवा त्वचेची जळजळ.ऍलर्जीमुळे पुरळ किंवा त्वचारोग.
डोळ्यांचे आजार: डोळ्यांची जळजळ, लालसरपणा.डोळ्यांत पाणी येणे किंवा खाज सुटणे.कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे) सारखे संसर्ग.
घशाचे आजार: घसा खवखवणे, गिळताना त्रास, घशात जळजळ किंवा कोरडेपणा, स्ट्रेप थ्रोट किंवा टॉन्सिलायटिसचा धोका.
- अपघातांचा धोका, खड्यांमुळे हाडे खिळखिळी
खराब रस्ते व रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याच्या घटना वाढत आहेत. यामध्ये अनेकजण जखमी होत आहेत. तर काहोना दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागत आहे. त्याचबरोबर वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. खडी व खड्ड्यांमुळे मोठी दुखापत होण्याचा धोका उद्भवत असुन याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अशी घ्या काळजी
-गाडीचा वेग मर्यादीत ठेवा.
-बाहेर जाताना मास्क
-हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या
-त्वचेला मॉइश्चरायझर लावा
-सनग्लासेस किंवा चष्मा वापरा.
-डोळ्यांत पाणी टाकून धूळ काढून टाका
-कोमट पाण्याच्या गुळण्या करा
- तातडीने रस्ता दुरुस्तीची गरज
खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना राबवावी.
-अजित कोळी, नागरिक
- प्रतिबंधात्मक उपायोजनांची गरज
रस्त्यावरून उडणारी धूळ हवेत मिसळून प्रदूषण वाढते. यात बारीक धुलीकण श्वसनामार्फत प्रवेश करून फुफुसाचे आजार उद्भवू शकतात. धुळीतील रासायनिक द्रव्ये, सूक्ष्म कण त्वचा व डोळ्यांना हानी पोहोचवतात. यामुळे नागरिकांनी धुळीपासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजचे आहे. बाहेर पडताना मास्क वापरावा.
-डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक, सीपीआर








