कोल्हापूर / इंद्रजीत गडकरी :
कोल्हापूर जिह्याची ओळख बनलेला तांबडा-पांढरा रस्सा आणि इथल्या खास मसाल्यांची चव ही देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडच्या काळात जिह्याच्या बाहेर, अगदी राज्याच्या बाहेरही अनेक ठिकाणी ‘कोल्हापुरी‘ नावाखाली बनावट चव असलेले अति तिखट जेवण विकले जात आहे. यामुळे कोल्हापूरच्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा अपमान होत असून, ही परंपरा जपण्यासाठी जीआय टॅग (जीओग्राफीकल इंडिकेशन) अत्यंत आवश्यक आहे.
सध्या कोल्हापुरातील अनेक हॉटेल व्यावसायिक संघटना सातत्याने महाराष्ट्र शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत आहेत. यामध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा, कोल्हापुरी मटण आणि इथले मसाले यांना जीआय टॅग देण्याची मागणी पुढे आली आहे. कोल्हापूरच्या ‘तांबडा-पांढरा‘ रस्स्याचा दर्जा आणि पारंपरिकता कायम राहण्यासाठी हे मानांकन अत्यंत गरजेचे आहे. असे मत सचिन शानबाग यांनी व्यक्त केले आहे.
- कोल्हापुरी तांबडा-पांढऱ्याला का नाही?
हैदराबादच्या ‘हलीम‘ला 2010 मध्ये जीआय टॅग मिळाला आहे. तसेच तिरूपती बालाजी मंदीरातील लाडू यांना जीआय टॅग आहे. त्यामुळे हलीमचा, लाडू यांचा दर्जा, पारंपरिकता आणि प्रसिद्धी वाढली आहे. याच धर्तीवर कोल्हापूरच्या रस्सा-मसाल्यांना देखील जीआय मानांकन मिळाल्यास, इथली चव देश-विदेशात योग्य प्रकारे पोहोचू शकेल. आज जिह्याबाहेर काही ठिकाणी ‘कोल्हापुरी‘ नावाखाली केवळ अति तिखट पदार्थ विकले जात आहेत. मात्र, त्यात कोल्हापूरच्या खास मसाल्यांची चव किंवा पारंपरिक पाककृती अजिबात नसते. अशा प्रकारच्या बनावटपणामुळे ख्रया कोल्हापुरी चवीची बदनामी होते.
- आता खाद्यसंस्कृतीची नक्कल नको
‘प्राडा‘ने देखील काही दिवसापुर्वी ‘कोल्हापुरी चप्पल‘ची नक्कल केल्याची घटना गाजली होती. त्यानंतर कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईनसाठी पेंटटची प्रक्रिया रेटली गेली आहे. हीच बाब आता खाद्यसंस्कृतीबाबत घडु नये यासाठी कोल्हापूरी खाद्यपदार्थांना जीआय व पेंटट मिळाले पाहिजे. अशी जिह्यातील खाद्यसंस्कृती प्रेमींची इच्छा आहे.
- परंपरा टिकवण्यासाठी जीआय टॅग महत्वाचा
कोल्हापूरची खाद्यपरंपरा फक्त तिखट किंवा मसालेदार एवढ्यावरच नाही, तर ती शिस्तबद्ध मसाला वापर, विशिष्ट प्रकारचे बेत आणि पारंपरिक पद्धतीवर आधारित आहे. इथल्या मसाल्यांमध्ये लाल सुक्या मिरचीचे विशिष्ट प्रकार, नारळ, गोडेलेला कांदा, गोडसर मसाला, खोब्रयाचा समतोल वापर, काळा मसाला व खसखस यांसारख्या घटकांचा नेमका उपयोग होतो. हा स्वाद शास्त्राrय पद्धतीने सांभाळला जातो. त्यामुळे ही परंपरा टिकवण्यासाठी जीआय टॅग अनिवार्य ठरतो.
- हॉटेल व्यावसायिकांची मागणी
कोल्हापूर हॉटेल व्यवसाय संघटनांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे मागणी केली आहे की, कोल्हापूरच्या तांबड्या-पांढऱ्या रस्स्याला जीआय टॅग देण्यात यावा. यासाठी शासनाने जलद कार्यवाही करावी. यामुळे केवळ कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचे संरक्षण होणार नाही, तर जिह्याच्या हॉटेल व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. मसाल्याच्या उत्पादनास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि पर्यटन वाढण्यास हातभार लागेल.
- जीआय टॅगचा फायदा काय ?
-उत्पादनाच्या दर्जाला कायदेशीर मान्यता
-उत्पादनाची नक्कल थांबते
-आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध
-स्थानिक व्यावसायिकांना फायदा
-परंपरागत चव टिकते
-जीआय टॅगमुळे अस्सल चव पर्यटकांना मिळेल.
- हॉटेल व्यावसायिकांच्या मागण्या :
-तांबडा-पांढरा रस्सा व कोल्हापुरी मसाल्यांसाठी जीआय टॅग
-कोल्हापुरी खाद्यपदार्थाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग
-अन्न व कृषी विभागाकडून विशेष योजना
-स्थानिक हॉटेल व्यवसायांना प्राधान्य








