18 ऑक्टोबरपासून मोहिमेला प्रारंभ : जिल्ह्यातील 238 ग्राम पंचायतमध्ये माहिती संकलन सुरू
बेळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) 2024-25 वर्षासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचा अभिप्राय घेतला जात आहे. 18 ऑक्टोबरपासून या मोहिमेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील 238 ग्राम पंचायतीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन कामगारांकडून अभिप्राय आणि जॉबकार्ड वाटपाबाबतही माहिती घेण्यात येत आहे. अकुशल कामगारांना रोजगार हमी आधार ठरली आहे. त्यामुळे अलिकडे रोजगार कामगारांच्या संख्येत भर पडली आहे. मात्र अद्यापही या योजनेविषयी समाजात म्हणावी तशी जनजागृती नसल्याने रोजगारापासून वंचितही रहावे लागत आहे. यासाठी ग्राम पंचायत पातळीवर पुढील वर्षाचा रोजगाराचा आराखडा तयार केला जात आहे. यासाठी गावोगावी हे अभियान अधिक सक्रियपणे राबविले जात आहे. या अंतर्गत कामगारांची रक्कम, पुरुष महिला समान वेतन, कामाचा कालावधी, वैयक्तिक कामे, पात्र लाभार्थी याबाबतची संपूर्ण माहिती संकलन केली जात आहे. शिवाय ग्रामसभेमध्ये याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. शिवाय रोजगार कामगारांनी ग्राम पंचायतीमधील सभांमध्ये सहभागी होवून समस्या मांडव्यात, याबाबत जागृतीही केली जात आहे. या अभियानांतर्गत माहिती मिळवून पुढील वर्षाचा आराखडा तयार केला जाणार आहे.
लवकरच आराखडा तयार करणार
मनरेगा योजनेचा कृती आराखडा तयार करण्याची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली आहे. या अंतर्गत कामाची माहिती, वैयक्तिक कामाची माहिती, जॉबकार्ड वाटप यासह इतर कामांबाबत माहिती संकलन केले जात आहे. लवकरच हा आराखडा तयार करून सरकारकडून मंजुरी घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
– हर्षल भोयर, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी









