श्रीपेवाडी हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भाकणूक : कृष्णात डोणे महाराजांनी केले कथन
निपाणी : राजकारणात मोठा गोंधळ, राजदरबारी दंगा-धोपा होईल, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. सत्तासंपतीच्या मागे लागून भांडून खेळतील. राजकीय नेते सत्तेच्या बाजारात विकत मिळतील. कर्नाटकाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. एका पक्षात मोठी बंडाळी माजेल, राजकारणात पैसा न खाणारा नेता सापडणार नाही. राजकारणात महिला वर्ग बाजी मारेल. राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून बसतील. महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठा गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. आरक्षणप्रश्नी राजकीय नेते समाजात भांडणं लावतील, शासन दरबारी मजा बघत बसतील. जाती-जातीचे लोक आरक्षणासाठी भांडून खेळतील. मोठी आंदोलने पेटून जाळपोळ, दंगाधोपा होईल, संप हारताळाची वेळ देशावर येईल, भारत देशात एक मोठा कायदा येईल, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी केली. विजयादशमी दसऱ्यानंतरच्या द्वादशीला होणारी श्रीपेवाडी येथील हालसिद्धनाथांची यात्रा गुरुवारी पार पडली. यात्रेनिमित्त पूजाविधी, अभिषेक, पालखी मिरवणूक, ढोलवादन, जागर, फटाक्यांची आतषबाजी, हत्यार खेळविणे, धनगरी ओवी, गजनृत्य आदी विविध कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी पहाटे पहिल्या भाकणुकीचा मान असणारी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली. यावेळी भाविक उपस्थित होते.
धर्माच्या गादीला रामराम करा
मेघयान मळा आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा हाय बाळांनो, मेघ उदंड, हाय हाय बाळांनो बांदा आड बांद, मेघाची कावड गैरहंगामी हाय, मेघाच्या पोटी आजारगा हाय, पिका-पाण्यावर पीक, पाऊस याचा कालमान बदलत जाईल. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे. त्याच्या मागं अंधार आणि पुढही अंधार आहे. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाच हाय, पिंजऱ्यातला राघू भाषण करतोया, धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा, हालसिद्धनाथांचा जयजयकार करा, श्रीपेवाडी गावातील बसवान देवालय हालसिद्धनाथांची पवित्र भूमी राहील. श्रीपेवाडी प्रति आप्पाचीवाडी होईल.
वैरण, धान्याच्या चोऱ्या होतील
आलम दुनयेचा पेरा होईल, कुरी थाऱ्याला बसल, रोहिणीचा पेरा त्याला हादग्याची पुरवणी, देवयान धान्य मुबलक पिकलं, राजयान धान्य उदंड पिकलं, जमिनीतलं धान्य बहुत पिकलं, खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणशीला शेरावर येईल, मापट्या चिपट्यावर येईल. खरीप पीक उदंड पिकलं, दीड महिन्याच धान्य पिकलं, तांबडी ऱ्हास मध्यम पिकलं, पांढरं धान्य उदंड पिकलं मोलानं विकलं. गव्हाची पेंडी मध्यम पिकलं, मोलानं विकलं. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. धान्य दारात, वैरण कोपऱ्यात, वैरण सोन्याचं होईल, सांभाळून ठेवा.
भारत-पाक छुपं युद्ध होईल…!
सीमाभागाचं राजकारण ढवळून जाईल, निपाणी भागात मोठा गोंधळ होईल, अतिरेकी लोक येतील, घोटाळा करतील, बॉम्बस्फोट होतील शहरामागून शहरे उद्ध्वस्त होतील. जगातील अनेक देश एकमेकांच्या सोबत युद्ध खेळतील, भडका उडल युद्धामुळे जगात आजारकता माजल. भारत-पाकिस्तान छुपं युद्ध होईल. भारत पाकिस्तानचा चौथाई कोना काबीज करलं. चीन देश भारताविरोधात कुरघोड्या करलं, होईल सगळीकडे कापाकापी, माणसाला माणूस खाऊन टाकलं. दागिने, पैसा मनुष्याला सांभाळून ठेवावा लागेल. दिवसाढवळ्या डाकू दरोडे टाकतील. कानान ऐकशीला डोळ्यानं बघशीला.









