धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेअंतर्गत साहाय्य निधी : मंदिराच्या कामाला गती
वार्ताहर /किणये
चौगुलेनगर, मच्छे येथील मयुरेश्वर गणपती मंदिराच्या बांधकामासाठी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत दोन लाखाचा निधी मिळाला आहे. यानिमित्त मंदिराच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरेश्वर सेवा संघाचे अध्यक्ष शिवाजी चौगुले हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेचे जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी, प्रोजेक्ट ऑफिस बेळगाव तालुक्याचे नागराज हुदली, सुपरवायझर गंगा दोडर, संघटना अध्यक्ष ज्योती संकपाळ आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व श्री मंजुनाथ स्वामींच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एम. पी. लाड यांनी प्रास्ताविक करून मयुरेश्वर मंदिराच्या बांधकामाचा आढावा घेतला.
अध्यक्षांच्या हस्ते मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रदीप शेट्टी यांनी आपल्या भाषणात संस्थेचे कार्य कशा पद्धतीने सुरू आहे हे सांगितले. चौगुले नगरात मयुरेश्वर गणपती मंदिर बांधण्यात येत असल्यामुळे संपूर्ण भागातील नागरिक एकवटले आहेत. मंदिराचे कामही गतीने सुरू आहे.
या कार्यक्रमाला संघाचे संचालक सातेरी पाटील, दीपक रत्नाकर, राजू तोरसकर, सोनूकुमार पाटील, मारुती गुंजीकर, लक्ष्मी चौगुले, कावेरी पाटील, रेखा लाड तसेच धर्मस्थळ स्वसहाय्य संघाचे सदस्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. के गुरव यांनी केले. आभार अर्जुन पाटील यांनी मानले.









