महापालिकेमध्ये हस्तांतर प्रक्रियाही रखडली : दुसऱ्या टप्प्यात बेळगावचा समावेश, रेल्वेस्टेशनजवळील गाळ्यांचा लिलावही ठप्प
बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते, गटारी, पथदीप, रेल्वेबसस्थानकासमोरील गाळ्यांची निविदा, हस्तांतर प्रक्रिया, ना हरकत प्रमाणपत्र, थकीत पाणी आणि वीजबिल आदी समस्यांबाबत गुरुवारी झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर जयदीप मुखर्जी, सीईओ आनंद के., खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार राजू सेठ, नामनिर्देशक सदस्य सुधीर तुप्पेकर उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया मंजूर झाली आहे. मात्र दोन महिन्यांपासून पावसाचे कारण पुढे करून रस्ते कामांसाठी चालढकल केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचणी येवू लागल्या आहेत, असा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी ब्रिगेडिअर मुखर्जी यांनी ऑक्टोबरअखेरीस रस्तेकामांना चालना दिली जाणार असल्याचे सांगितले. कॅन्टोन्मेंट परिसरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र परिसरातील पथदीप नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होणार आहे. तातडीने दुरुस्तीची कामे मार्गी लावावीत, असा मुद्दा नामनिर्देशक सदस्य सुधीर तुप्पेकर यांनी उपस्थित केला.
61 कॅन्टोन्मेंटचे हस्तांतर होणार
कॅन्टोन्मेंट हस्तांतर प्रक्रिया रखडली आहे. देशातील 61 कॅन्टोन्मेंटचे हस्तांतर होणार आहे. यापैकी दोन कॅन्टोन्मेंटचे हस्तांतर झाले आहे. शिवाय 24 कॅन्टोन्मेंटना नोटिफिकेशन देण्यात आले आहे. मात्र यामध्ये बेळगावचा समावेश नाही. दुसऱ्या टप्प्यात बेळगावचा समावेश केला जाणार आहे. शिवाय केंद्र प्रशासनाकडून परवानगी आल्यानंतर हस्तांतर होणार आहे. सद्यस्थितीत हस्तांतराची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. कॅन्टोन्मेंट परिसरातील मालमत्ता विक्री व खरेदीसाठी नोंदणी कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) विचारले जात आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार ना हरकत प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसरातील मालमत्ता विक्रीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शिवाय कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
रेल्वेस्टेशन समोरील बसस्थानकाचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधण्यात आला आहे. शिवाय कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतर करण्यात आले आहे. येथील 12 गाळ्यांसाठी दोन ते तीनवेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र नागरिकांनी याकडे पाठ फिरविली आहे. भाड्याची रक्कम जादा असल्याने ही निविदा प्रक्रिया रखडली आहे. कॅन्टोन्मेंटकडून वीजबिल आणि पाणीबिल थकले आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मात्र पूर्वीच्या थकीत बिलाच्या तुलनेत बिल कमी राहिले आहे. येत्या महिन्यात थकीत वीजबिल शून्य होईल, अशी माहितीही कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर जयदीप मुखर्जी यांनी दिली.









