हिमाचल-उत्तर प्रदेशात 5 जणांचा मृत्यू ; : दिल्लीत 80 उड्डाणे, 30 रेल्वे प्रभावित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये थंडीने जोर धरला आहे. या राज्यांच्या अनेक भागात सकाळी दाट धुके पडत असून काही भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी असते. दाट धुक्यामुळे सामान्य जनजीवन आणि रस्ते, हवाई आणि रेल्वे सेवांवर परिणाम होत आहे. हिमाचल आणि उत्तर प्रदेशात घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थानमध्ये 31 डिसेंबर रोजी हवामान खात्याने थंड दिवसाचा इशारा दिला आहे. 5 जानेवारी 2024 पासून या राज्यांमध्ये थंडी आणखी वाढणार असून 11 जानेवारीपर्यंत कडाक्मयाच्या थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवस दिल्ली-एनसीआर भागात दाट ते दाट धुके पडण्याची शक्मयता आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 19.8 अंश सेल्सिअस नोंद झाले असून ते या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा एक अंश कमी आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडत आहे. दिल्लीत धुक्यामुळे 80 हून अधिक विमाने आणि 30 रेल्वेफेऱ्या प्रभावित झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. दिल्लीसोबतच बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, आसाम आणि त्रिपुरा आदी राज्यांमध्ये 31 डिसेंबरलाही अनेक ठिकाणी दाट धुके राहण्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.
पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता
हवामान खात्यानुसार, पुढील 24 तासांत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि हिमवृष्टीची शक्मयता आहे. याशिवाय 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलका पाऊस होऊ शकतो. यासोबतच केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, या काळात दक्षिण तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.









