वंदे भारत एक्सप्रेस’चे कारवार रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत
प्रतिनिधी/ कारवार
एका बाजूला सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर उत्सुकता, उत्कंठा, हुरहुर, जल्लोष आणि अपेक्षा व स्वप्नपूर्तीचे समाधान तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस व भाजप नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी असे चित्र शनिवारी कारवार-कोकण रेल्वेस्थानकावर दिसून आले. कारण होते कर्नाटकातील चौथ्या वंदे भारत एक्सप्रेसचे.
कारवार स्टेशनवर झालेले थाटात आगमन, कारवार जिल्हा प्रशासनाने वंदे भारत एक्सप्रेसचे येथील स्थानकावरील आगमनाचे इवेंट रुपांतर केले होते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. रेल्वे आगमनाची वेळ जसजशी जवळ येत होती तशी सर्वांची नजर रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या (स्टेशनच्या दक्षिण दिशेला) बोगद्याकडे सर्वांची नजर लागून राहिली होती. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
मंगळूर सेंट्रल रेल्वे स्टेशनचा निरोप घेऊन 11 वाजता निघालेली वंदे भारत एक्सप्रेस कारवार आणि बिणगा दरम्यानच्या बोगद्यातून बाहेर पडली आणि ठीक 3.30 वाजता रेल्वेस्थानकावर दाखल होताच एकच जल्लोष करण्यात आला. एखाद्या देवीच्या पालखीवर फुलांची उधळण करावी त्याप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेस फुलांच्या उधळणीने न्हाऊन निघाली.
सुमारे 300 शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास
मोफत पासच्या मदतीने कारवारहून मडगावपर्यंत प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर दाखल झालेल्या सुमारे 300 विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपण एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झालो… याची झलक दिसून येत होती. ढोल आणि ताशांचे वादन सुरू होते. वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. आणि बघता बघता येथील शेकडो प्रवाशांसह एक्सप्रेस मडगावच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाली.
बेंगळूरहून मुर्डेश्वर धावणाऱ्या रेल्वेचे कारवारपर्यंत विस्तारिकरण करा : आमदार सतीश सैल
कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गेले अनेक महिने जिल्ह्यातील किनारपट्टीवासियांची स्वप्न बनून राहिलेली वंदे एक्सप्रेस पुन्हा नक्कीच परत येणार, असे सांगत मडगावला निघून गेली. शिरवाड (कारवार) रेल्वेस्थानकावर आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना आमदार सैल म्हणाले, केंद्र सरकारने वंदे भारत रेल्वे सुरू करून जनतेला नवीन वर्षाची भेट दिली आहे. बेंगळूरहून मुर्डेश्वर धावणाऱ्या रेल्वेचे कारवारपर्यंत विस्तारिकरण करावे, अशी मागणी पुढे सैल यांनी केली.
यावेळी कारवारच्या माजी आमदार रुपाली नाईक यांचे भाषण झाले. यावेळी कारवार जि. पं. चे मुख्य कार्यदर्शी ईश्वर कांदू, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश राजपूत, कोकण रेल्वेचे प्रादेशिक मॅनेजर बी. बी. निकम, सिनीयर प्रादेशिक इंजिनीअर बी. एस. नाडगे आदी उपस्थित होते.









